उस्मानाबाद / प्रतिनिधी-
राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत असून मदत करीत आहेत. संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली असून सर्वच व्यापार, उद्योग बंद करण्यात आले आहेत त्यामुळे गरीब व गरजू नागरीकांचे अतोनात हाल होत आहेत. तरी  तुळजाभवानी मंदीर संस्थान मार्फत  गोरगरीब जनतेस जिवनावश्यक किट वाटप करा, अशी मागणी  खा. ओमराजे निंबाळकर यांनी  मंदिर समितीच्या अध्यक्षांकडे केली आहे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलं आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन विविध प्रकारे मदत करत आहेत.कोरोनाचे संकट वाढू लागले असल्यामुळे इतर मंदीर संस्थानप्रमाणे श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थानने देखील जिल्हयातील एकही गरीब व गरजू कुटुंब जीवनावश्यक वस्तुंपासून वंचीत राहू नये याकरिता मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे.
शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थानने जिल्हयातील गरीब व गरजू कुटुंबियांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचे किट तयार करून वाटप करण्याबाबत तात्काळ नियोजन करावे, ही विनंती ही ओमराजे यांनी केली आहे.

 
Top