उमरगा/प्रतिनिधी-
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती उमरगा तालुक्यात भीम अनुयायांनी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमाद्वारे घरीच साजरी केली.1956 नंतर पहिल्यांदाच भीम जयंती सार्वजनिक ठिकाणी न करता घरी साजरी केली.
दरवर्षी भीम अनुयायी बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत असतात.उमरगा शहरात तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढली जाते.त्यानिमित्ताने संपूर्ण शहर निळ्या पताक्याने व झेंड्याने सजविले जाते तर नगरपालिके समोरील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला रोषणाईने उजलविले जाते.पण यावर्षी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असून या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून देशात व महाराष्ट्रात लॉक डाऊन घोषित केले आहे.सार्वजनिक ठिकाणी लोकांना एकत्रित येण्यासाठी बंधन घालण्यात आले आहे.याचे सावट आंबेडकर जयंतीवर ही पडले असून उमरगा शहरातील व तालुक्यातील विविध जयंती मंडळांनी एकत्र येऊन प्रसिध्दी पत्रक काढून यावर्षी आंबेडकर जयंती भीम अनुयायांनी घरीच पुस्तके वाचून व विविध उपक्रम घेऊन साजरी करावी असे आवाहन केले होते.तर प्रशासनानेही नागरीकांनी आंबेडकर जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन केले होते व विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.उमरगा शहरात मंगळवारी दि.14 रोजी भीम अनुयायांनी घरीच आंबेडकर जयंती साजरी केली.घरातच बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.विविध व्हाट्सएपच्या ग्रुपवर वाचन अभिवादन हा उपक्रम साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.घरात लहान थोर मंडळी 12 तास आंबेडकरी साहित्य वाचन करण्याच्या या संकल्प मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसून आले.अश्या प्रकारे अभिनव अभिवादन महामानवास करण्यात आला.तर शहरातील मुन्ना तांबोळी या पेंटरने शहरातील मुन्शी प्लॉट परिसरात बाबासाहेबांच्या जयंती निमित्त कोरोना रोगविषयीचे जनजागृती व्हावी म्हणून जनजागृती संदेश भिंतीवर रंगवून बाबासाहेबाना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.
डिजीटल युगात डिजीटल माध्यमाचा zoom एप्लिकेशन्स चा उपयोग करून बाबासाहेबांना अभिवादन करण्याची संकल्पना संविधान विचार मंच व शिक्षक आघाडी यांच्या वतीने करण्यात आले.बाहेर पडण्याऐवजी घरातूनच डिजीटल माध्यमातून महामानवाच्या विचारांचा जागर करण्यात आला.या डिजीटल माध्यमांचा उपयोग करून आंबेडकर विचाराचा ऑनलाईन जागर करण्यात आला. महामानवाला अभिवादन करण्यासाठी या या मोहिमेत प्रवीण स्वामी, पद्माकर मोरे, विठ्ठल सूर्यवंशी, जनार्दन शिंदे सर, महादेव पाटील, राहुल कांबळे यांनी सहभाग घेतला व डॉ बाबासाहेबांविषयी  स्वतःच्या शब्दात मत व्यक्त करून आदरांजली वाहिली.
शहरातील पालिकेसमोरील बाबासाहेबांच्या पुतळा स्थापने नंतर पहिल्यादाच 14 एप्रिल रोजी जयंती दिवशी पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी लोकांनी टाळले..एखाद दोन व्यक्ती सोडले तर प्रशासनाच्या अवहणानुसार भीम अनुयायांनी पुतळा परिसराकडे येणे टाळले.दिवसभर भरगच्च कार्यक्रम व सायंकाळी बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक यामुळे हा परिसर 14 एप्रिल रोजी प्रचंड गजबजलेला असतो पण यंदा यापासून सर्वकाही अलिप्त होते.

 
Top