उस्मानाबाद / प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या वतीने जिवनावश्यक वस्तुंच्या मदत किटच्या वितरणाचा शुभारंभ मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते करण्यात आला. उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालय कक्षात सोमवारी (दि.२०) काही गरजुंना वाटप करण्यात आले.
कोरोना प्रादूर्भाव व लॉकडाऊन स्थितीमुळे बेरोजगार झालेल्या गरीब व गरजुंना तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने जिवनावश्यक वस्तुंच्या किटचे मदत करण्याचा निर्णय मंदीर संस्थानच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी घेतला आहे. तांदुळ, दाळ, तेल, साखर, चहा, पावडर, साबण आदी साहित्याचा या किटमध्ये समावेश आहे. मंदीर संस्थानने ५ हजार किटसाठी २५ लाख रूपये निधी मंजूर केला आहे. या जिवनावश्यक किटचे उस्मानाबाद येथे सोमवारी जिल्हाधिकारी मुधोळ यांच्या हस्ते गरजुंना वाटप करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, जिल्हा पुरवठा अधिकारी चारूशिला देशमुख, तहसीलदार गणेश माळी, नायब तहसीलदार राजाराम केलुरकर, लोकसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. स्मिता शहापूरकर आदी उपस्थित होते.
 
Top