उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 संचारबंदी व लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना उस्मानाबाद येथे मंगळवारी (दि.२१) जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना किटचे वाटप करण्यात येणार आहे.
कोरोना रोगाच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी लागू केल्याने तब्बल एक महिन्यापासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. याचा सर्वाधिक फटका वृत्तपत्र क्षेत्राला बसला आहे. वृत्तपत्र छपाई, वाहतूक, वितरण, वसुली आदी कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे लाखो कामगार, कर्मचारी व वृत्तपत्र विक्रेत्यांवर उपजिविकेचे संकट उभे ठाकले आहे. याची दखल घेवून उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांची सोमवारी (दि.२०) भेट घेवून वृत्तपत्र विक्रेत्यांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी मुधोळ यांनी दखल घेवून मान्यता दिली. त्यानुसार उस्मानाबाद येथे मंगळवारी (दि.२१) तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार गणेश माळी व पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते २९ वृत्तपत्र विक्रेत्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष जाधव, प्रदेश प्रतिनिधी मोतीचंद बेदमुथा, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, नायब तहसीलदार राजाराम केलुरकर, मंडळ अधिकारी श्री देशपांडे, श्री नाईकनवरे, श्री अकोसकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना वाटप करा
उस्मानाबाद शहराप्रमाणे तुळजापूर, कळंब, उमरगा, भूम, परंडा, वाशी, लोहारा, मुरुम, नळदुर्ग शहरांसह ग्रामीण भागातील वृत्तपत्र विक्रेत्यांनाही त्या-त्या तहसील स्तरावरुन जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्याची मागणी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी केली आहे.

 
Top