उस्मानाबाद/प्रतिनिधी-
केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत गरीब कुटुंबांना अंत्योदय व प्राधान्य रेशन कार्डावर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रेशन दुकानांमधुन सध्या नियमित मिळणा-या धान्याशिवाय कोणत्याही व्यक्तीची अन्नाविना उपासमार होऊ नये याकरीता प्रती व्यक्ती पाच किलो जास्तीचे तीन महिन्याचे धान्य मोफत द्यावयाचे आहे. ते त्वरीत वितरीत करावे अशी मागणी आ. सुजतिसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करावे लागल्यानंतर लागलीच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारने जनतेसाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा करुन गरीब, शेतकरी, मजुर, महिला, वृध्द, निराधार, विधवा, अपंग, खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आदी समाजातील खुप मोठया वर्गाला मोठा दिलासा देण्याचे काम केले असुन त्याची प्रत्यक्ष अंमलवजावणीही सुरु झाली आहे.
सध्या शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रेशन दुकानांतुन फक्त नियमित दिले जाणारे २ रुपये किलो प्रमाणे गह व ३ रुपये किलो प्रमाणे तांदुळ याचेच वितरण सुरु आहे. तरी केंद्र सरकारच्या योजनेतील जास्तीचे मोफत द्यावयाचे एप्रिल, मे व जून या तीन महीन्यांचे मोफत धान्य रेशन दुकानांतुन तातडीने लाभधारकांना वितरीत करण्यात यावे.
तसेच रेशन कार्ड असुनही त्यांनी काही महीने रेशन वरील माल उचलेला नाही. अशा लोकांना आता धान्य मिळत नाही. त्यांनाही धान्य दिले जावे. ज्यांच्याकडे रेशन रेशन कार्ड नाही त्यांना आधार कार्ड आधारे धान्य द्यावे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड व आधार कार्ड दोन्ही नाही. अशांना तहसीलदारांकडुन नांवे प्रमाणित करुन रेशन दुकानातुन धान्य वितरीत करण्याची मागणी ठाकूर यांनी केली आहे.
 
Top