बसवंतवाडी येथे जिल्ह्यातील पहिल्या रोजगार हमीच्या कामास सुरुवात 
उस्मानाबाद / प्रतिनिधी-
लॉकडाउन च्या काळात लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी केंद्र सरकारने मनरेगा कामांना परवानगी दिली असल्याने ग्रामीण भागातील श्रमिक वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मनरेगाची कामे हाती घेण्यात येणार आहेत व त्या माध्यमातून विकास कामे करण्यात येतील , असे मत आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे मनरेगा च्या कामाचा शुभारंभ करताना केले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे रोहयोच्या कामांना खीळ बसली होती. परिणामी, ग्रामीण भागात श्रमिक वर्गाच्या हाताला कोणतेच काम राहिले नव्हते. त्यामुळे यावर्गासमोर आर्थिक संकट उभे टाकले आहे. केवळ पोट भरण्यासाठी स्वस्त धान्य मिळत असले तरी हाताला कोणतेच काम नसल्याने मजूर वर्गाच्या आर्थिक नाडय़ा आवळल्या गेल्या होत्या. जवळ पैसा नसल्याने या वर्गाची प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. अशातच रोजगारासाठी मोठ्या शहराकडे गेलेल्या नागरिकांचा देखील रोजगार गेल्याने अभुतपुर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीत श्रमिक वर्गाला दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी २० तारखेपासून ‘मनरेगा’ ची कामे हळूहळू सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार बसवंतवाडी तालुका तुळजापूर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजने अंतर्गत गणेश बळी शिंदे ते विजय जनाध॔न शिंदे या रुपये ७५५३२० किंमतीच्या (कुशल व अकुशल मिळून) शेतरस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. सदर कामांना शासनाची परवानगी मिळाल्यावर सुरू करण्यात आलेले हे जिल्ह्यातील मनरेगाचे पाहिले काम आहे. वि.का सोसायटीचे सदस्य तथा गावातील जेष्ठ नागरिक मोहनराव जाधव यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या कामावर २० मजूर काम करणार असून, काम करताना सर्वांनी सोशल डीस्टेसिंग, मास्क अथवा रुमालचा वापर यासह कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी सरकारने घालून दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे अनिवार्य असुन आपल्या स्वतःच्या व समाजाच्या सुरक्षेसाठी आपण याचे काटेकोरपणे पालन करा असे आवाहन आ.पाटील यांनी उपस्थित मजूर व त्यावर नियंत्रण करणाऱ्या शासकीय यंत्रणेला केले. सोबतच त्यांनी बसवंतवाडी येथे या योजनेच्या माध्यमातून शेतमालाची साठवण करण्यासाठी एक गोदामाचे काम देखील घेण्यात यावे अशा संबंधितांना सूचना दिल्या.
गावात रोजगार मिळत नाही म्हणून मोठय़ा शहरांमध्ये कामासाठी गेलेल्या परंतु लॉक डाउन मुळे विस्थापित झालेल्या मजुरांनी करोनाच्या काळात पुन्हा गाव जवळ केले आहे. तरी सध्या लॉकडाउन सुरु असल्याने केवळ गावातील मजुरांनाच नव्हे तर, काम मागेल त्याला हे काम उपलब्ध करून द्यावे. बाहेरून आलेल्यांसोबत जर गावात परराज्यातील मजुर असतील तर त्यांनाही यात समाविष्ट करून घ्यावे, असे आ.पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, उपसरपंच गणेश उंबरकर, हिराजी देडे, ग्रामसेवक करदुरे, ग्रामपंचायत सदस्य, रोजगार सेवक, सोसायटी चेअरमन व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी मास्क, रुमाल अथवा कपड्याचा वापर करून योग्य अंतर राखत सोशल डीस्टेसिंगचे देखील पालन केले होते.

 
Top