उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी टेस्टिंग लॅब सेंटर याकरिता आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास कार्यकम (आमदार निधी) अंतर्गत 25 लक्ष रुपये निधी उपलब्ध करुन दिला असून तसे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित तीन रुग्ण होते. या कोरोना बाधित रुग्णांचे उपचारानंतर अंतिम दोन्ही तपासणी अहवाल नकारात्मक आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. जिल्ह्यातील अनेकांचे स्वब नमुने तपासणीसाठी घेऊन ते अन्य जिल्ह्यात तपासणीकरिता पाठविले जातात. मात्र त्यांचे अहवाल येण्यास बराच अवधी लागतो. पुढील काळात कोरोना प्रादुर्भावाचा धोका बळावेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायमस्वरुपी कोरोना टेस्टिंग सेंटर उपयुक्त ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात तज्ञ मनुष्यबळ असून असे टेस्टिंग लॅब सेंटर सुरु करण्याकरिता 66 लाख 77 हजार 473 रुपये निधीचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे.आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या आमदार सथानिक विकास कार्यकम निधीतून विशेष बाब म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्र येथे कोरोना विषाणूतपासणी केंद्र निर्माण करण्याकरिता इतर तत्सम वैद्यकीय यंत्रसामुगरी व साहित्य खरेदी करणेसाठी 25 लक्ष रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे.

 
Top