
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्राची दक्षिण काशी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आज कामदा एकादशी (चैत्र वारी) ची श्री. विठ्ठलाची पूजा चैत्र एकादशी दिवशी पहाटे श्री. विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली.
पंढरपूर येथे वर्षभरात होणा-या प्रमुख चार यात्रांपैकी एक चैत्र वारी असून नव सवंत्सरातील पहिली चैत्र वारी असते. दरवर्षी चैत्र शुद्ध पंचमी ते चैत्र शुद्ध एकादशी या काळात पंढरपुरात मोठी यात्रा असते. विठ्ठलच्या दर्शनाला लाखो भाविक येत असतात. मात्र यावर्षी देश व राज्यातील कोरोना विषाणुंचा फैलाव या राष्ट्रीय आपत्तीमुळे चैत्र यात्रा रद्द केली गेली असून मंदिर समितीने आधीच निश्चित केल्याप्रमाणे पांडुरंगाची नित्यपुजा श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर व त्यांच्या पत्नी सौ.शैला ठाकूर यांच्या हस्ते शनिवार ४ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता करण्यात आली.
‘विठ्ठल चरणी साकडे’
कोरोना विषाणूचा फैला
व यामुळे या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात लाखो विठ्ठल भक्त प्रत्यक्ष पंढरपूरात येऊ शकले नाहीत. या संकटाच्या काळात चैत्र वारीतील श्री. विठ्ठलाची नित्यपुजा मला सर्वांचा प्रतिनिधी म्हणून करण्याचे भाग्य लाभले, अशी भावना आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी व्यक्त करून देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्याचे धैर्य आणि बळ देऊन सर्वांची या संकटातून लवकर मुक्तता कर, असे साकडे श्री. विठ्ठलाला घातल्याचे आमदार ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा श्री.विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, नायब तहसीलदार तथा व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख अमित नवले, श्रीकांत सानप उपस्थित होते.