उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्त दोन रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा संतर्क झाली आहे.उमरगा तालुक्यातल्या बलसूरमध्ये प्रशासनाने रात्रीतून सर्व सार्वजनिक ठिकाणे सील केली असून, गावाच्या सीमा तसेच उमरगा तालुक्याच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. गुरूवारी रात्री मुंबईतून आलेल्या रिपोर्टनुसार लोहारा तालुक्यातील धानोरी येथे दुसरा एक कोरोनाबाधित युवक निष्पन्न झाल्याने त्याच्यावरही उमरग्याच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धानोरीमधील १० जणांना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
महसूल आणि आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील बलसूर येथील संबंधित युवक आणि त्याची पत्नी दोघेही काही दिवसांपूर्वी पानिपत तसेच दिल्लीला फिरण्यासाठी गेले होते. मात्र, गावात परतल्यानंतर त्यांनी आरोग्य तपासणी केली नाही. गावकऱ्यांच्या आग्रहानंतर १ एप्रिल रोजी त्याचे स्वॅब नमुणे घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी सायंकाळी त्याचे रिपोर्ट उपलब्ध झाले. त्यात तो पॉजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या पत्नीचा रिपोर्ट नॉर्मल आला असला तरी तो ज्या व्यक्तींच्या संपर्कात आला, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. बलसूरमधील जवळपास १५ जणांना प्रशासनाने आरोग्य तपासणीसाठी ताब्यात घेतले असून, यामध्ये युवकाच्या कुटुंबातील १० व्यक्तींचा समावेश आहे. गावाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तर 2 मेपर्यंत गावातील व्यक्तींना बाहेर जाण्यास किंवा बाहेरून गावात येणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे.
दुसरीकडे लोहारा तालुक्यातील धानोरी येथील युवकाला कोरोना झाल्याचे रात्री उशिरा मुंबईतून जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले आहे. सदरील युवक मुंबईत ताज हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत होता. त्याची मुंबईत असतानाच तपासणी करण्यात आली होती.त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, दरम्यानच्या काळात तो भाजीच्या वाहनातून गावाकडे आला होता.गुरूवारी रात्री मुंबईतील प्रयोगशाळेतून रिपोर्ट आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याचा शोध घेतला.त्याने दिलेल्या माहितीनुसार गावात आल्यानंतर त्याने शेतात पीकाच्या मळणीची कामे केली. यादरम्यान तो आजूबाजूच्या गावांमध्येही फिरला होता. तो ज्यांच्या संपर्कात आला, अशा लोकांना शोधून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे.
 
Top