उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दि.(29) रोजी सकाळी दहा वाजता संध्या मुंबईत वास्तव्यास असलेले तथा काटी येथील रहिवासी  बापू  बाळा नारायणकर (सेवा निवृत्त सहसचिव मंत्रालय, मुंबई ) यांच्या वतीने पत्रकार उमाजी गायकवाड,अहमद पठाण यांच्या मार्फत 18 गरजू, अपंग, वृध्द,विधवा, हातवर पोट असणाऱ्या  कुटुंबांना 15 दिवस पुरेल एवढे गहू, तांदूळ,तेल,मीठ, हळद, मिरची, साखर, चहापत्ती,शेंगदाणे या वस्तुंचा समावेश असणाऱ्या किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करित साहित्याचे वाटप करून उर्वरित लाभार्थ्यांना घरपोच साहित्य दिले.
कोरोनाच्या या संकट काळात आणि लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर जन्मभूमी काटी गावातील गोरगरिबांना मदतीचा हात द्यावा या उदात्त हेतूने व गावाविषयी वाटणाऱ्या आत्मियतेने मुंबईत राहूनही सामाजिक व मानुसकिच्या भावनेतून व कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गावाविषयी वाटणाऱ्या काळजीपोटी, येथील गोरगरिबांविषयी वाटणाऱ्या ओढीने तसेच सामाजिक कार्याची आवड असणारे सेवा निवृत्त सहसचिव मंत्रालय, मुंबई तथा काटीचे सुपूत्र बापू बाळा नारायणकर यांनी 18 गरजू कुटुंबांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते किराणा साहित्याच्या किटचे वाटप केले. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच हजार रुपये दिले.
सध्या कोरोना परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. सामाजिक कार्याने पछाडलेले आणि माणुसकीच्या भावनेबरोबर कृतिशील जोड देणारे बापू बाळा नारायणकर  यांच्या मदतीमुळे गरजूंना चांगलाच आधार झाला असून लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी सरपंच आदेश कोळी, सयाजीराव देशमुख, सुजित हंगरगेकर,पत्रकार उमाजी गायकवाड, माजी सरपंच अशोक जाधव,  मकरंद देशमुख, अहमद पठाण,अनिल बनसोडे,करीम बेग,नजीब काझी, सतीश देशमुख, माजी सैनिक श्रीकांत गाटे, इजदानी बेग, पोलीस पाटील जामुवंत म्हेत्रे, संजय साळुंके, प्रशांत सुरवसे  आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top