उस्मानाबाद/ प्रतिनिधी- 
उस्मानाबाद जिल्हातील भूम, कळंब, उमरगा व उस्मानाबाद येथील एमआयडीसीची अत्यंत वाईट दुरावस्था झाली असून या ठिकाणी सुरू व बंद असलेल्या उद्योगावर कोणाचेही नियंत्रण नसल्याची बाब समोर आली आहे. उद्योग सुरू करण्याच्या नावाखाली अनेकांनी मोठ-मोठे प्लॉट घेत त्यावरील सबसिडी व विविध शासकीय लाभ मिळाल्यानंतर ते पद्धतशीरपणे बंद पाडत त्याच जागा भाड्याने देण्याचा नवीन उद्योग एमआयडीसीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून अर्थकारणाच्या माध्यमातुन सुरू केला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्राला वाली कोण? असा सवाल या निमित्ताने समोर येत असून नवीन उद्योजकांना एमआयडीसी उद्योग सुरु करण्याची संधी कधी मिळणार हे पाहावे लागेल. उस्मानाबाद जिल्ह्यातील एमआयडीसीचा सर्व कारभार हा लातूर येथून हाकला जात असल्याने अनेक प्रक्रिया व साधी माहिती मिळण्यास सुद्धा अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. उस्मानाबाद येथील तेरखेडा, कौडगाव व वडगाव एमआयडीसीची घोषणा करून अनेक वर्ष झाली तरी हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. तेरखेडा च कौडगाव एमआयडीसीतील क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करीत भूखंड निर्माण व वाटप करण्याची प्रकिया रखडलेली आहे तर वडगाव एमआयडीसीची प्रक्रिया भूसंपादनाच्या व मावेजाच्या लालफितीच्या कारभारात अडकलेली आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीत नवीन भूखंड व उद्योग सुरु करायचे असतील तर एक नवीन विकासात्मक धोरण आखणे व नियोजनबध्द कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. शिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीच्या विकासाचा संपूर्ण कारभार लातूर ऐवजी उस्मानाबाद येथुनच कार्यान्वीत होणे गरजेचे आहे. तरच जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीच्या कामकाजात सुसूत्रता निर्माण होऊन या जिल्ह्याचा विकास होऊ शकेल.
उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या एमआयडीसीचा विकास गेल्या अनेक वर्षापासून रखडला असून उस्मानाबाद येथील औद्योगिक वसाहतीतील बहुतांशी उद्योग हे बंद पडलेले आहेत. तर काही लोकांची या एमआयडीसीत मक्तेदारी झालेली आहे. उस्मानाबादच्या औद्योगिक वहसाहतीतील उद्योगांचे पुनर्जीवन करण्यासाठी आजवर कुठलेही ठोस प्रयत्न केल्याचे दिसत नाही. काही अधिकाऱ्यांच्या नकारात्मक मानसिकतेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील नवीन तरुण उद्योजकांना प्लॉट मिळणे तर दूरच पण प्रक्रियेची साधी माहिती सुद्धा मिळत नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील सध्या स्थितीत असलेल्या ४ व २ प्रस्तावित एमआयडीसीचा कारभार हा लातूर येथून सुरू असून उंटावरून शेळ्या हाकण्याचा कारभार सुरु आहे. एमआयडीसी भागातील अनेक उद्योग प्लॉटचा वापर हा व्यावसायिक प्रयोजनासाठी नियमबाह्य पद्धतीने सुरु असून
यातून लाखोंच्या रुपयांचे व्यवहार झाले आहेत. एमआयडीसी भागात काही उद्योजक मंडळींची मक्तेदारी असून ही टोळी इतर व्यावसायिक किंवा तरुण उद्योजकांना त्या क्षेत्रात प्रवेश करू देत नाही. एखादा प्लॉट शिल्लक असला की लगेच त्यावर डोळा ठेवून तो अधिकाऱ्यांना हाताशी धरून हडप केला जात आहे. काही जागा कमी पडत असल्याचे कारण सांगत एक्सटेंशनच्या (विस्तारीकरण) नावाखाली प्लॉट अल्पश: दराने काबीज केले जातात. एमआयडीसी भागात शासकीय दराने प्लॉट मिळत नसले तरी येथे ज्यांना अगोदर प्लॉट मिळाले आहेत त्यांनी मात्र जागा भाड्याने मिळेल असे फलक लावले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी भागातील कागदपत्रावरील उद्योग पडताळण्याची व ऑडिट करण्याची गरज आहे. ज्यांनी प्लॉट घेऊन वर्षानुवर्षे उद्योग सुरु केले नाहीत ते ताब्यात घेऊन नवउद्योजकांना संधी देणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील एमआयडीसी भागात प्लॉट भाड्याने देण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने या भागातील औद्योगिक विकास थाबला आहे. भाड्याचा हा उद्योग तेजीत असून एमआयडीसीच्या परस्पर हस्तांतरण व भाड्याने देण सुरु आहे. साध्या १०० रुपयाच्या बॉण्डवर भाडेपट्टा करार करून व्यवहार राजरोस सुरू आहेत तर बंद पडलेल्या प्लॉटला जाब विचारणारा कोणीही नाही.
उस्मानाबाद शहरातील एमआयडीसी भागात एकूण ३२२ प्लॉट असून त्यात २२४ प्लॉट हे उद्योगासाठी तर १० कमर्शियल, ११ अमिनिटी, ११ ओपन स्पेस, ३ निवासी प्लॉट असून या सर्व भागाची मदार केवळ एका कर्मचाऱ्यावर असल्याने नियंत्रण शक्य नाही. अशीच स्थिती भूम,कळंब व उमरगा भागाची आहे. या सर्व भागाचा कारभार लातूर येथून असल्याने उद्योजकांना माहिती घेण्यासह इतर कामासाठी लातूर दर्शन करावे लागते त्यामुळे ही दर्शन वारी आर्थिक दृष्ट्या परवडणारी नसल्याने पाठपुरावा करणे शक्य होत नाही त्यामुळे अनके प्रकल्प रखडतात,

 
Top