उस्मानाबाद/ प्रतिनिधी
कोरोनाचा प्रकोप वाढलेल्या सोलापूर तसेच अन्य जिल्ह्यातून अपडाऊन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात नोकरी करणारे अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच अन्य विभागातीलही कर्मचारी अन्य जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. यामध्ये सोलापूर शहरात वास्तव्य करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. प्रामुख्याने तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुक्यात हे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे आदेश असतानाही या आदेशाची पायमल्ली त्यांच्याकडून पूर्वीपासूनच होत आहे. सध्या कारोनाच्या पार्श्वभूमीवरही त्यांच्याकडून अपडाऊन सुरूच होते. सध्या सोलापूर शहरात मोठ्याप्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. तेथून जिल्ह्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही संख्या कमी नाही. यामुळे जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या कर्मचारी व नागरिकांना मोठा धोका होऊ शकतो. यामुळे याची दखल घेऊन पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. यासोबतच त्यांनी उपविभागिय पोलिस अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनाही त्यांनी यासंदर्भात लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.

 
Top