उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात शनिवार, 18 रोजी जिल्हा परिषडेच्या बांधकाम विभागाअंतर्गत जिल्ह्यात पहिल्या विकासकामाची सुरुवात करण्यात आली. या कामाची पाहणी करत असताना तेथे उपस्थित सर्वानी मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग व स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.
लॉकडाऊनमुळे जिल्हा परिषदेअंतर्गत सुरु असलेले पाटोदा ते तोरंबा या रस्त्याचे काम बंद करण्यात आले होते. शासकीय नियमानुसार सदर काम आज जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन सुरु करण्यात आले आहे. रस्त्याचे काम सुरु केले असल्याचे समजल्यानंतर लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती दत्त देवळकर यांनी आवर्जून भेट देऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. यावेळी तेथे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जातात का? एकमेकांमध्ये अंतर ठेवून काम व्यवस्थित केले जाते का? मास्कचा वापर, हँडवॉश किंवा साबणाने हात धुण्याची सोय केली गेली आहे का? याबाबतची आवर्जून पाहणी करत तेथील कामगारांकडे याबाबीची विचारपूस केली. तसेच सोशल डिस्टंसिंग व स्वच्छतेच्या नियमांचे पालन न केल्यास गुन्हे दाखल होऊ शकतात याची आठवण करून देत. या बाबी अनिवार्य करून त्याचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता व कंत्राटदार यांना दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या श्रीमती पाटील, शाखा अभियंता, सरपंच प्रवीण भद्रे, कल्याण लोदगे आदी उपस्थित होते. 
 
Top