कळंब/प्रतिनिधी-
उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयातील अथर्व सतिश  मातने या पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आई-वडिलांनी वेळोवेळी दिलेल्या पैशाची बचत करत एक गल्ला केला होता. त्यातच 16 एप्रिल रोजी त्याचा वाढदिवस होता.वाढदिवसादिवशी गल्ला फोडायचा व सायकल आणायची असं अगोदरच ठरलं होतं मात्र यावर्षी लॉकडाऊन असल्यामुळे गल्ला फोडून त्या पैशाचं करायचं काय असा प्रश्न त्याच्यासमोर होता.अथर्वने  पेपर मधील व टीव्हीवरील बातम्या पाहून त्याच्या वडिलांसमोर आपण हे पैसे कुणाला तरी मदती करता देऊ असा विचार मांडला. या विचाराला त्याच्या वडिलांनी संमती देत तुझ्या गल्यात जेवढे पैसे निघतील तेवढेच पैसे मी परत टाकेल व आपण एकूण जमलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला पाठवू असे ठरले.
त्यानंतर अथर्व  सहा सात महिन्यापासून बचतीचे पैसे गल्ल्यात टाकत होता. वाढदिवसादिवशी  तो गल्ला फोडला त्यात 1252 रुपये निघाले व वडिलांनी 1248 रुपये टाकत 2500 रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ऑनलाईन पाठवले. त्याचबरोबर सर्व  शहर बंद असल्यामुळे केक न कापता एक टरबूज कापत आपला वाढदिवस अथर्वने साजरा केला त्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक तर होतच आहे पण इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांला इतकी समज कोरोनोच्या महाभयानक संकटामुळे आली की काय अस वाटू लागले आहे. कदाचित त्यांनी दिलेली अडीच हजार ही रक्कम खूप मोठी नाही पण त्यांनी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सायकलसाठी बचत करून ठेवलेले पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिल्याने त्याच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
 विशेष म्हणजे त्याची एक सोशल मीडियावर व्हिडिओ क्लीप देखील व्हायरल होत आहे आणि त्यात त्याने म्हटले आहे की १६ एप्रिल रोजी माझा वाढदिवस होता. माझ्या वाढदिवसानिमित्त मी फूल ना फुलाची पाकळी म्हणून २५०० रु. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत आहे. मुख्यमंत्री हे मला विश्वासू वाटतात व ते महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढतील अशा आशयाची  व्हिडीओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 
Top