उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोना विषाणूचे संकट दूर करण्यासाठी महाराष्ट्रात टाळेबंदी आहे. त्यामुळे घरगुती वीज ग्राहक व शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे. त्यामुळे मार्च ते जून महिन्यात येणारे संपूर्ण वीजबिल माफ करण्याची मागणी जनता दल सेक्युलरचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड. रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
टाळेबंदी कालावधीत बंद असणाऱ्या औद्योगिक व वाणिज्य ग्राहकांचे वीजबिल पुढील तीन महिन्यांसाठी स्थगित केली आहेत. परंतु, सर्वसामान्य, गरीब वीज ग्राहक व शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून तो टाळेबंदी नंतरही वीजबिल भरू शकणार नाही. हातावर पोट असणाऱ्या सामान्य ग्राहकांना दररोजच्या जीवनातील जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची ताकद सुद्धा राहिलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांचे वीजबिल माफ करून राज्यातील जनतेला दिलासा देण्याची मागणी ॲड. भोसले यांनी केली आहे.
 
Top