उस्मानाबाद/प्रतिनिधी
धान्य वितरणात गडबड करणाऱ्या ६ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, १४ दुकानांची अनामत रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना प्रत्येक स्वस्त धान्य दुकानावर दक्षता समिती सदस्य, शिक्षक किंवा अन्य शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदेश काढून त्यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना धान्य वाटप करावे, असे निर्देश दिले आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांना धान्यांचे परिमाण व दर कळावे या उद्देशाने दरफलक दर्शनी भागात लावणेबाबत सूचित केले आहे. तक्रारीसाठी ९८९०७४८८५५,९७०८१४८५६,९४०४४२१४२७ हे व्हॉटस्अॅप क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. प्राप्त तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यात येत आहे. गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असलेल्या जिल्ह्यातील सहा दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील यु.बी.भोगे, गंधोरा येथील एम.आय.शेख,लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील सुंदराबाई महिला बचत गट यांचे दुकान क्रं.२, व व्ही.एस. सोलापुरे यांचे दुकान क्रं.३, उमरगा तालुक्यातील मुरुम येथील चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी दुकान क्रं.२ ,भूम तालुक्यातील तिंत्रज एस.एम.लांडे यांचे दुुकान निलंबित करण्यात आले आहेत. तसेच किरकोळ स्वरुपाच्या तक्रारी असलेल्या जिल्ह्यातील १४ रेशन दुकानांचे डिपॉजिट जप्त करण्यात आले आहे. यामध्‍ये उस्मानाबाद तालुक्यातील १०, तुळजापूर तालुक्यातील २, उमरगा व परंडा तालुक्यातील प्रत्येकी एका दुकानाचा समावेश आहे. आता दक्षता समितीच्या उपस्थितीत धान्य वितरण होईल.
 
Top