उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाच्या अद्यावतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 5 कोटी 88 लाख 50 हजाराच्या निधीचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकराव गडाख यांनी दिली आहे.
 आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशासह भारतावर कोरोना विषाणूचे संकट ओढवलेले आहे. आपल्या जिल्ह्यात ही कोरोना बधित रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे या संकटास सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासन परस्परात योग्य समन्वय ठेवून काम करत आहे, असे पालकमंत्री गडाख यांनी सांगितले.
 जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य यंत्रणेत पुरेशी औषधे,साहित्य, यंत्रणा असणे अपेक्षित आहे.या प्रसंगी जिल्हा शासकीय रुग्णालयात, उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत साधनसामुग्री असणे अपेक्षित आहे. आयसोलेशन वाँर्ड, कोरोना चाचणी किट, पीपीई कीट, मास्क, औषधसाठा आदी साहित्य घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून पाच कोटी 88 लाख पन्नास हजाराचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. ही सर्व अद्ययावत यंत्रसामग्री कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक साहित्य आरोग्य यंत्रणेच्या हाती दिल्यानंतर आरोग्य विभागाने अधिक सक्षमपणे कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्री गडाख यांनी केले.
 जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जावू नये. प्रत्येकाने घरात थांबावे. गरज असेल तरच बाहेर पडावे. त्यातही सोशल डिस्टसिंग पाळावे. अन्यथा घरात बसून
प्रशासनाला सहकार्य करावे. घरात राहून स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यावी.घरात थांबून राहिलो तरच आपण कोरोनाला हरवू शकतो, याकरिता नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आव्हान पालकमंत्री गडाख यांनी करून सर्दी, ताप, खोकला असेल तर तात्काळ शासकीय आरोग्य केंद्रात जावून तपासणी करून घेण्याचे ही सूचित केले.
ज्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यांनी विलगिकरण कक्षात राहवे. काही नागरिक होम क्वारंटाईनमध्ये असतानाही इतरत्र फिरत असल्याचे दिसून आले आहे. अशा
नागरिकांवर प्रशासनाने  कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील डॉक्टर्स, नर्स, यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या धैर्याने या संकटाचा सामना करीत असल्याचे ही त्यांनी सांगितले.
 जिल्ह्यातील कोरोना आजाराची परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही परंतु योग्य ती दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. रुग्णांची संख्याही वाढलेली नाही. बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वच संशयीतांचे स्वॅब नमुने तपासले आहेत. ते सर्व निगेटीव्ह आले आहेत. तरीही काळजी घेणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री गडाख यांनी सांगून आरोग्य विभागाची गरज पाहून यापुढेही पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाने घेतल्याची माहिती  दिली. नागरिकांना एकच आवाहन आहे की, त्यांनी घराबाहेर पडू नये. घरात थांबावे, यातूनच कोरोनाचा प्रतिबंध होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
 
Top