उस्मानाबाद/प्रतिनिधी-
राज्य शासनाने नुकताच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील 83 व जिल्ह्यातील चार अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा समावेश आहे. या पाश्र्वभूमीवर सदरील निर्णय रद्द करावा या मागणीसाठी जिल्ह्यातील शिराढोण व सांजा येथील नागरिकांसह शिक्षणप्रेमींनी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अन्यथा बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्याथ्र्याना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करून तज्ञांकडून अभ्यासक्रमही तयार करून घेण्यात आला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांना शिक्षणाचे नवे दालन उघडले गेले होते. परंतु, सदर मंडळाने अभ्यासक्रमाबाबत पाळलेल्या गोपनीयतेवर बोट ठेवून पारदर्शकतेचा अभाव असल्याचे सांगत हे शिक्षण मंडळच रद्द केले आहे. त्यामुळे या शाळांचा आंतरराष्ट्रीय दर्जा व त्या अनुशंगाने मिळालेल्या सुविधांचीही कपात केली जाणार असल्याने शिक्षणप्रेमींसह पालकांमध्ये नाराजी पसरली आहे. याच पाश्र्वभूमीवर शिराढोण येथील नागरिकांनी सोमवारी (दि.2) निवासी उपजिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सदरील शिक्षण मंडळ पुन्हा सुरू करावे अन्यथा दि.5 रोजी कळंब-लातूर रोडवर विद्यार्थी-पालकांसह रास्ता रोको आंदोलन करून दि.6 पासून बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
 
Top