उस्मानाबाद/प्रतिनिधी-
भारतासह जगभरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राने तर त्यासाठी आणीबाणी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारही या संसर्गजन्य आजारापासून बचाव व्हावा यासाठी प्रतिबंध करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहे. राज्य शासनाने खबरदारी म्हणून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळून सतर्क राहायला हवे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक आहे मात्र घाबरून जाता कामा नये असे आवाहन आमदार रणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यात एकही संशयित अथवा बाधित रूग्ण अद्याप आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाकडून सांगण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणायला हव्यात. प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचा अंमल आणि त्याचा आदर करत सर्वांनीच सतर्क राहणे गरजेचे आहे. शक्यतो गर्दी होईल असे कार्यक्रम टाळावेत. शक्य असल्यास अधिकाधिक वेळ घरी थांबण्यास प्राधान्य द्यावे असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू नये यासाठी राज्य सरकारने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा जारी केला आहे. त्याचाच भाग म्हणून मोठ्या शहरातील सिनेमागृह, नाट्यगृह, मॉल्स बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत हद्दीतील शाळा आणि महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने देशभरात मोहिम हाती घेतली आहे. राज्य शासन देखील योग्य त्या खबरदारी अंमलात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून आपण स्वतः सातत्याने माहिती घेत आहोत. हा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना जिल्ह्यात तत्परतेने अंमलात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहाणे आवश्यक आहे. जगभरातील अनेक प्रगत देश प्रतिबंधात्मक काळजी घेत आहेत.  सर्दी, ताप, खोकला या आजाराची लक्षणे दिसून आल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि संसर्ग टाळण्यासाठी योग्य त्या खबरदारीचे उपाय अनुसरावेत असेही राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार देशभरातील दहा कोरोनाग्रस्त रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. त्यांना उपचारानंतर रूग्णालयातून घरी परत जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. जगभरातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या प्रकृतीत देखील मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे. तरी देखील सार्वजनिक कार्यक्रम टाळून गर्दीच्या ठिकाणी न जाता सतर्क राहणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

 
Top