
छत्रपती शिवरायांनी मुघलांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आम्हाला सन्मानाने वागण्याची शिकवण दिली. त्यामुळे माता भगिनीनो सन्मानाने जगा आणि वागा, देशासाठी आणि धर्मासाठी त्याग करायला शिका. कारण देश आणि धर्माहून अधिक काहीच नाही. तरुणांनो व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आई- वडिलांची सेवा करा आणि शिवरायांच्या भूमीत ताठ मान आणि सन्मानाने जगायला शिका असे आवाहन हभप शिवलीला पाटील यांनी केले.
आदर्श एकता संघटना उमरगा आयोजित पतंगे रोड उमरगा येथे ह.भ.प.शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचा कार्यक्रम गुरुवारी दि.27 रोजी घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, माऊली प्रतिष्ठाणचे अध्यक्ष उमाकांत माने, नगराध्यक्षा सौ. प्रेमलता टोपगे, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, विक्रम बिराजदार, बाळासाहेब माने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी किर्तनकार शिवलीला पाटील यांचा सौ दिपाली बिराजदार आणि आशा चव्हाण यांच्या हस्ते स्वागत करून यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश चव्हाण, विजयसिंह बिराजदार, किशोर कांबळे, प्रशांत गुरव, नितीन खमीतकर, संकेत कुलकर्णी, गणेश चव्हाण, अक्षय चव्हाण, साईराज बिराजदार, प्रवीण पाटील आदिनी परिश्रम घेतले.