उमरगा/प्रतिनिधी
साहित्याचे विविध प्रकाराद्वारे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आणि जगणे सुंदर होण्यासाठी प्रबोधनाचे दमदार बीज आजही साहित्यिक पेरत आहेत. साहित्य हे संस्कार आणि प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्याने  साहित्यिकांच्या अनेक प्रयत्नाने  कथा, कविता, नाटके, कांदब-या आदींना  बहर येतोय. साहित्य हे आनंदी जीवनाची पर्वणी आहे, असे मत कवी गुंडू दुधभाते यांनी व्यक्त केले.
मराठवाडा साहित्य परिषद उमरगा शाखेच्या वतीने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मुळज रोड, तुरोरी येथील सिद्धीविनायक मंगल कार्यालयात कै.कालिदासराव पाटील मंचावर निमंत्रीत कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी मराठवाडा साहित्य परिषद केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर यांच्या हस्ते कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला अभिवादन व दिपप्रज्वलन करुन कविसंमेलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी प्राचार्य एस वाय जाधव, प्रदीप पाटील, सुभाष वैरागकर,सारिका लोकरे हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात  कवी गुंडू दुधभाते बोलत होते.
कार्यक्रमात सारिका लोकरे , कवी सुधाकर झिंगाडे , अॅड. शुभदा पोतदार , प्रा.कान्होपात्रा शिंदे ,प्रा.शरद गायकवाड, प्रा. डॉ प्रवीण गायकवाड, रेखाताई सूर्यवंशी, बाळासाहेब माळी, बाबूराव कांबळे, प्रशांत पाटील यांनी सुंदर कविता सादर केल्या तर भूमिपुत्र वाघ यांनी अभंग सादर केला. त्यानंतर मनोहर गायकवाड, प्रा. शफी मुल्ला, पाशाभाई कोतवाल, करीम शेख  गझल सादर करून संमेलनात रंगत आणली. काशिनाथ बिराजदार यांनीही कविता सादर करून उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी प्रा. अवंती सगर, प्रदीप पाटील, शरद पाटील, पूजा माणिकवार यांच्यासह उमरगा, गुंजोटी, तुरोरी, आष्टा आदी परिसरातून साहित्य प्रेमींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कै. कालिदासराव पाटील विचार मंचच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.

 
Top