उस्मानाबाद/प्रतिनिधी-
पुणे वेध शाळेने जाहीर केल्याप्रमाणे रविवार दि.१ मार्चच्या पहाटे १ वाजता झालेल्या अवकाळी पावसाने शेतक-यांचे करोडो रूपयांचे नुकसान केले आहे. अवकाळी पावसाबरोबरच वादळी वारा असल्याने अनेक शेतक-यांच्या द्राक्ष, आंबा बागेचे नुकसान झाले आहे.
रविवारच्या पहाटे वादळी वा-यासोबत पडलेल्या अवकाळी पावसाने शेतक-यांना पुन्हा आर्थिक संकटात टाकले आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, काढणीला आला असून ज्वारी चे पिक भरत असतानाच या पिकांना पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. ज्या शेतक-यांनी अथक परिश्रम करून द्राक्ष बाग, आंब्याची बाग जोपासली आहे, त्यांचे ही मोठे नुकसान झाले आहे. वादळी वा-यामुळे व अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागा कांही ठिकाणी आडव्या झाल्याच्या दिसून आल्या.
हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी वर्गात नैराश्याचे वातावरण पसरले आहे.
पंचनामा करण्याची मागणी
रविवारीच्या वादळी वा-यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतक-याच्या पिकाचे झालेल्या नुकसानीचा त्वरीत पंचनामा करून शेतक-यांना उचित मोबदला देण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे. जिल्हयात मंत्री संदीपान भुमरे आले असता, कांही ठिकाणी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली.

 
Top