उमरगा/प्रतिनिधी-
पालिकेतील अपहाराची एक - एक प्रकरण बाहेर येत आहेत. बनावट बँक खाते, पालिकेच्या धनादेशाचा वापर करून अपहाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अपहाराची मर्यादा थांबलेली असेल असे वाटत असताना संगनमताने इंटरनेट बँकिंगचा अवलंब करून मोठ्या चाणाक्ष पद्धतीने अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान लेखा विभागाने केलेल्या चौकशी चार टप्पात एकुण एक कोटी 61 लाखाचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात तत्कालीन लेखापाल, दोन कंत्राटी कर्मचा-यासह दोन खाजगी व्यक्तीचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे आता तर नव्याने पालिकेचे कामे घेणा-या एका संस्थेच्या ठेकेदाराचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. या एकुणच अपहाराच्या धाडसामागे अन्य बड्या व्यक्तीचे अप्रत्यक्ष पाठबळ असल्याची चर्चा होते आहे. प्रकरण उघडकीस आल्याने " मी तो नव्हेच " अशा अविर्भावात कांही जण फिरताहेत याचा अर्थ या प्रकरणात "तडजोडी" चा मार्ग अवलंबल्याची जोरदार चर्चा होत आहे.
उमरगा पालिकेच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याची पहिलाच प्रकार आहे. पहिल्यांदा 31 ऑगस्ट 2019 रोजी 49 लाखाचे अपहार प्रकरण उघडकीस आले होते, त्यानंतर शहरातील महाराष्ट्र बँकेत ठेवण्यात आलेल्या दलित वस्ती सुधार योजनेचे एक कोटी रक्कमेवरील 36 लाख व्याजाची रक्कम हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला.  तिसऱ्या टप्प्यात लेखा विभागाच्या तपासणी आठ लाख 64 हजार 802 रक्कमेचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आता नव्याने 66 लाख 40 हजार 496 रुपयाच्या अपहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. एसबीआय बँक स्टेटमेंटच्या व्यवहार नोंदीवरुन तसेच बँकेच्या पत्रव्यवहारावरून चौकशी समितीतील मूख्याधिकारी प्रकाश पाटील, लेखापाल अंकुश माने, नगर अभियंता रविंद्र सोनवणे, हरिषकुमार दाडगे यांनी उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दिलेल्या पुरवणी चौकशी अहवालानुसार तत्कालिन लेखापाल विनायक वडमारे, नंदेशकुमार झांबरे, धम्मपाल ढवळे यांच्यासह श्री. महाशुभप्रदा प्रा.लि. व नोव्हा कोअर टेंडरिंग प्रा.लि. यांनी संगनमत करून इंटरनेट बँकिंगचे युजर आयडी व पासवर्डचा परस्पर गैरवापर करणे, खाजगी ई - मेल आयडी पालिकेच्या बँक खात्याला संलग्न करणे, वैयक्तिक खरेदी व देणे अदा करण्यासाठी शासकिय रक्कम इतरत्र वळवून वापर करून 66 लाख 40 हजार 496 रुपयाचा अपहार केल्याची पुरवणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अपहारातील "छुपे रुस्तुम" शोधण्याचे व्हावे धाडस ! 
विविध विकास कामाचा निधी, ठेवीवरील व्याज हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आता तर  इन्कम टॅक्स टीडीएस, जीएसटीची रक्कम जमा असलेल्या चीफ ऑफीसर, मुन्सिपल कौन्सिल (प्रोफेशनल टॅक्स)  ( क्र 62268264402)  या खात्यावरून इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे दिसून येते आहे. चौकशी समितीने प्रथमदर्शनी निदर्शनास आलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या नोंदीचे विवरणही पोलिसांकडे दिले आहे. त्यात 34 ट्राँजेशनद्वारे 66 लाख 40 हजार 496 रुपयाचा अपहार केल्याचे दिसते. त्यात एका ठेकेदाराकडे सहा वेळा रक्कम ट्रॉझेशन झाल्याचे दिसते. दरम्यान पहिल्या तीन अपहाराच्या प्रकरणातील एकच आरोपी अटकेत होता तो सध्या कारागृहात आहे. चार आरोपींचा सहा महिन्यापासुन तपास लागत नाही. यावरून पोलिस यंत्रणेच्या तपास कामाची किव वाटते. दरम्यान या अपहाराची शहरातील नागरिकात नकारात्मक चर्चा होत आहे. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांत समन्वय नाही, नेहमी आरोप - प्रत्यारोप होत आहेत. अपहार प्रकरणाबाबत मात्र छडा लावण्याची मागणी होत नाही. पोलिस यंत्रणेने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपासकामातुन छुपे रुस्तुमचे चेहरे नागरिकांसमोर आणण्याचे काम करण्याची मागणी होत आहे.
 
Top