उस्मानाबाद/प्रतिनिधी-
राज्य सरकार ने सादर केलेल्या अर्थसंकल्पात जिल्हयाचा विकासाबाबत कोणताही उल्लेख केला नसल्याने आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मेडीकल कॉलेज, सोलापूर-तुळजापूर रेल्वे मार्ग, टेक्नीकल टेक्स्टाइल हब, वॉटर ग्रीडला भरीव मदत आदी मागण्या मान्य करून घेण्यासाठी लोक आंदोलन उभारणार असल्याची माहिती, आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. तर खा.ओमराजे निंबाळकर, आ.कैलास पाटील, माजी.जि.प.उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील यांनी सरकारचे अभिनंदन करत सर्व समाज घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल, अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे.

आंदोलन उभारणार
जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्याचा समावेश केला असला तरी तुटपुंजी असली तरी 200 कोटींची तरतूद करून झुकते माप दिल्याबद्दल अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार. परंतु, अत्यंत महत्त्वाचे कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, टेक्निकल टेक्स्टाइल पार्क उभारणी, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या उभारणीचा अर्धा हिस्सा शासनाने उचलावा आदी मागण्यांकडे दुर्लक्ष केले असून यापैकी एकालाही वित्तीय तरतूद नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे जनआंदोलन उभे करावेच लागेल व जनतेच्या पाठबळावरच हे प्रश्न मार्गी लागतील अशी आशा आहे.
                                                                   -राणाजगजितसिंह पाटील, आमदार, भाजप.

आशावादी अर्थसंकल्प
शासनाच्या या अर्थसंकल्पाने शेतक-यांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली आहे. कारण नियमित कर्जफेड करणा-या शेतक-्यांचा कधीही विचार झाला नव्हता. सरकारने त्यासाठी तरतूद केली आहे. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना शासनाकडून जाहीर होत आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प आशावादी आहे.
                                                                 - संजय पाटील दुधगावकर, माजी झेडपी उपाध्यक्ष.

सर्व समावेशक अर्थसंकल्प
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा सादर केलेला पहिला अर्थसंकल्प वास्तवाचे भान असलेला शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुकर होण्यासाठी पाऊल टाकणारा अर्थसंकल्प आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या मराठवाडा वॉटरग्रीडमध्ये आपल्या जिल्ह्याचा तिस-या टप्प्यातून पहिल्या टप्प्यात समावेश केला. दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतक-यांना ओटीएस योजना, नियमित कर्ज भरणा-यांना 50 हजारााचा लाभ, दरवर्षी एक लाख नवीन सौरकृषीपंपाद्वारे विजेची उपलब्धता, क्रक्रीडा क्षेत्रातील तरतूद आदींचा समावेश असून अर्थसंकल्पाचे स्वागत आहे.
                                                                                  - कैलास पाटील, आमदार, शिवसेना.

पुढे घेऊन जाणारा अर्थसंकल्प
महाराष्ट्र सरकारने शेतकरी हा केंद्रबिंदू मानून हा अर्थसंकल्प सादर केला आहे. याचा फायदा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना होणार आहे. ऊस शेतीसाठी ठिबक सिंचन योजना राबवणार आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक तालुक्याला एक वेगळे महिला पोलिस ठाणे या घोषणा निश्चितच महाराष्ट्राला विकासात्मक वाटेवर पुढे नेणा-या आहेत.
                                                                                 -डॉ. प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस.
योग्य न्याय मिळाला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पहिल्याच अर्थसंकल्पात सर्व समाजघटकांना न्याय देऊन हे सरकार सर्वांच्या हिताचा विचार करत असल्याचे दाखवून दिले. कृषी विभागासह महिलांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करून देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली. रोजगार निर्मितीसाठीही तरतूद केली. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, तरुण, विद्यार्थी, मागास या सगळ्यांसाठीच हा अर्थसंकल्प नक्कीच आश्वासक आहे. महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी बचत गटासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. तसेच महिला अत्याचाराच्या घटनांना चाप बसविण्यासाठी विशेष पोलिस ठाण्यांची प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभारणी करण्याची घोषणा म्हणजे महिलांच्या संरक्षणाची हमीच असणार आहे.
                                                                 -ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार, उस्मानाबाद (शिवसेना).
 
Top