परंडा/प्रतिनिधी-
पुरातत्व विभागाकडून तालुक्यातील डोंजा येथील खैरी नदी पात्रात मिळालेल्या प्राचीन मंदिर अवशेषांची पुरातत्व विभगाच्यावतीने ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पाहणी करून माहिती घेण्यात आली.
औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अजित खंदारे यांनी दिलेल्या आदेशानुसार औरंगाबाद विभागातील समन्वयक डॉ. कामाजी डक व ज्ञानेश्वर गावडे यांनी तालुक्यातील डोंजा या गावात खैरी नदीच्या पात्रातील मिळालेल्या मंदिर अवशेषांची पाहणी केली. नदीत मिळालेल्या प्राचीन मंदिराच्या अवषेशबाबत इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अॅण्ड कल्चरल हेरिटेज नवी दिल्लीचे आजीव सदस्य अजय माळी यांनी नुकतेच राज्य पुरातत्व विभाग मुंबईचे संचालक यांना दिलेल्या पत्राची तत्काळ दखल घेऊन पुरातत्व विभगाने पाहणी केली आहे.
या परिसरात नंदीची सुंदर मुर्ती, मंदिराच्या शिळा, काही कोरीव दगडी अवशेष आढळून आले आहेत. खैरी नदीच्या पात्रात मिळालेलेले हे मंदिराचे अवशेष हा डोंजा गावचा अमुल्य ऐतिहासिक ठेवा असून येथे जेसीबी च्या सहाय्याने  खोदकाम करण्यात येवु नये, खोदकाम केल्यास हे शिल्पे खंडीत होऊ शकतात, असे पुरातत्व विभागातील डॉ. डक यांनी यावेळी सांगितले.
गावक-यांनी  देखील पहाणी दरम्यान सहकार्य केले व आवश्यक माहिती देखील दिली. मंदिराच्या अवशेषबात गर्भगृह प्रवेश पायरी, पाण्याचे दगडी कुंड, दगडी दोन शिहा, दगड व चुण्याच्या सहाय्याने बांधकाम केल्याचे अवशेष आढळून आले आहेत. यावेळी डोंजा येथील अॅड. हरिश्चंद्र बाळासाहेब सुर्यवंशी, माऊली भाग्यवंत, बापुराव सुर्यवंशी, दिनकर मोरे यासह कांही महिला ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top