उस्मानाबाद/प्रतिनिधी -
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोहारा पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यात तिघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन दुचाकी, 3 मोबाइल व एक एलइडी टीव्ही असा मुद्देमाल जप्त केला.
लोहारा पोलिस ठाण्यात गतवर्षी दाखल भादंवि कलम 457, 380 या गुन्ह्यात संशयित म्हणून आरोपी अविनाश दिलीप भोसले, अजय दिलीप भोसले (दोघे रा. पाटोदा पेढी) व राजा देविदास भोसले (रा. तीर्थ खु.ता. तुळजापूर) यांच्या शोधात पोलिस होते. दरम्यान, पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर पोलिस अधीक्षक संदीप पालवे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि डी.एम. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आशिष खांडेकर यांच्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे कारवाई करत वरील तिघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून दोन दुचाकी, 3 मोबाईल व एक एलइडी टीव्ही जप्त करण्यात आली. ही कारवाई सपोनि खांडेकर यांच्यासह सपोफौ - घायाळ, पोहेकॉ- माळी, झोंबाडे, रोकडे, पोना- घुगे, समाधान वाघमारे, गव्हाणे, कावरे, पोकॉ- ठाकुर, सर्जे, महिला पोकॉ- सोनवणे आदींनी केली.

 
Top