तुळजापूर/प्रतिनिधी-
सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील तामलवाडीच्या हद्दीत घरगुती गॅस सिलिंडर घेऊन जाणा-या ट्रकने अचानक पेट घेतला. त्यानंतर सिलिंडरचे धमाके सुरू झाले. आगीचे उंचच उंच लोळ उठले. सगळा परिसर हादरून गेला. अर्धातास हा थरार सुरू होता. उडालेले सिलिंडर घटनास्थळापासून 50 ते 60 फूट अंतरावर फेकले गेले होते. काळपट पत्रे सर्वत्र विखुरले गेले होते. चालकाने प्रसंगावधान राखून तामलवाडी गावापासून ही ट्रक दूर नेली. त्यामुळे कशाचेही नुकसान झालेले नाही.
मंगळवारी सायंकाळी साडेसहा सुमारास ही घटना घडली. सोलापूर आणि तुळजापूर येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या लगेच घटनास्थळी धावल्या. अध्र्यातासात त्यावर नियंत्रणही मिळवले. तामलवाडी पोलिस ठाण्यापासून जवळच ही घटना झाल्याने पोलिसांनी तातडीने महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली. त्यामुळे दोन्ही बाजूंना दीड-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
गॅस भरलेले 200 सिलिंडर या ट्रकमध्ये (एमएच 25 पी - 1177) होते. सोलापूरहून उस्मानाबादच्या नीरज गॅस सर्वि्हसकडे हा ट्रक निघाला होता. सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी चालकाच्या केबिनमध्ये छोटीशी आग लागल्याचे लक्षात आले. चालकाने तामलवाडीपासून ट्रक दूर नेऊन थांबवला. आग विझवण्याचे प्रयत्न केले. परंतु ती अधिक भडकली. मागे सिलिंडर असलेल्या जागेत पोहोचली. त्याचे रौद्ररूप पाहून चालक तेथून पळून गेला. आग भडकल्याचे पाहून पोलिस धावत आले. त्यानंतर सोलापूर आणि तुळजापूर येथून पाण्याचे बंब आले. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण मात्र समजलेले नाही.

 
Top