उस्मानाबाद/प्रतिनधी-
तुळजापूर शहराला रेल्वे मार्गाशी जोडण्यासाठी नगर-परळी-बीड रेल्वे मार्गाप्रमाणे सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या मार्गासाठी राज्याने पुढाकार घेणे गरजेचे आहे. 80 किलोमीटरच्या या रेल्वेमार्गासाठी आवश्यक असलेल्या 953 कोटी खर्चापैकी अर्धा हिस्सा राज्य सरकारने रेल्वे बोर्डाकडे सुपूर्द करावा, अशी मागणी तुळजापूरचे भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. नगर-परळी मार्गासाठी शासनाने 866 कोटी 84 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला होता, याप्रमाणे हा निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत उस्मानाबाद असून, मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या उस्मानाबादसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी यासाठी मागील तीन दशकांपासून सोलापूर-जळगाव रेल्वेमार्ग सुरू करण्याची मागणी केली जात आहे. या नवीन रेल्वेमार्गाचे 2009 मध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.पश्चिम महाराष्ट्र या नवीन रेल्वेमार्गामुळे मराठवाड्याशी जोडला जाणार आहे. त्यातून मराठवाड्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. हा रेल्वेमार्ग तुळजापूरमार्गे जात असल्याने देशभरातील नागरिकांना तुळजाभवानीच्या दर्शनाची सुविधा निर्माण होणार आहे. तत्कालीन खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 468 किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव अंतिम मंजुरी व निधी मिळविण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता.
सोलापूर-जळगाव हा रेल्वेमार्ग यापूर्वीच मंजूर झाला असला तरी त्यातूनच सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नव्या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव समोर आला. त्यानिमित्ताने धार्मिक पर्यटनाला मोठा वाव मिळणार असून केंद्रीय रेल्वेमंत्रालयाने जुलै 2018 मध्ये हा नवीन रेल्वेमार्ग मंजूर केला. रेल्वे मंत्रालयाच्या 2018-19 च्या नियोजनात देखील त्याचा समावेश करण्यात आला. या नवीन रेल्वेमार्गामुळे उस्मानाबाद आणि सोलापूरच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्याबरोबरच देशभरातून तुळजापूर येथे भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ होणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता, असेही आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 
Top