
आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर माणूस माणसापासून दूरावत असताना अशा वेळी दिवगंत लतादेवीनी जे संस्कार केले ते माणसातील माणूसपण निर्माण करण्यासाठी उपयोगी असून ती सेवाभावीवृत्तीच माणसाला माणूस बनवते असे प्रतिपादन केंद्रीय माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले.
नाईकनगर, ता.उमरगा येथील विठ्ठलसाई माध्यमिक विद्यालयाच्या प्रागंणात उभारण्यात आलेल्या दिवगंत मातोश्री लतादेवी यांच्या भव्य पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण व पिताश्री माणिकराव राठोड यांचा जीवन गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मंगळवार (ता.18) रोजी ते बोलत होते. या सोहळयाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ.जनार्धन वाघमारे होते. यावेळी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार सि.ना. आलूरे गुरुजी, नाशिकच्या सुप्रसिध्द कीर्तनकार अंजलीताई शिंदे, शौलेश पाटील चाकूरकर, प्रा.बी.व्ही.मोतीपवळे, प्राचार्य राजाराम राठोड, माणिकराव राठोड, माजी सरपंच योगेश राठोड, सरपंच रचना राठोड आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना शिवराज चाकूरकर म्हणाले की, माणसाने जीवनभर केलेल्या कार्याचा आढावा गौरव ग्रंथात मांडला गेला आहे.जीवन जगताना असे काम करा की लोक तुमचा आदर्श घेतील. चांगले विचाराच जीवनाला आकार देत असतात त्या विचाराप्रमाणे आयुष्यभर जगले पाहिजे असे ते शेवटी म्हणाले. यावेळी माणिकराव राठोड यांच्या जीवन गौरव ग्रंथ प्रकाशन शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.या ग्रंथाचे संपादक प्रा.विजयकुमार शिंदे यांनी या ग्रंथाबद्लची भूमिका मांडली. मनोगत मांडताना माणिकराव राठोड यांनी कौटुंबिक जीवनपट व लेखाजोखा सर्वांसमोर मांडला. बसवराज पाटील यांनी राठोड परिवारांनी केलेल्या सेवा व त्यांच्या कार्याबद्ल गौरव उद्गार काढले. जर्नाधन वाघमारे यांनी अध्यक्षस्थाना वरुन बोलताना म्हणाले की, मातीत देखील मोती असतात आपण त्यांचा शोध घेतला पाहिजे. अत्यंत प्रतिकुल काळात काम करुन समाजासमोर त्यांनी एक आदर्श ठेवला आहे. जो ग्रंथ प्रकाशित झाला तो निश्चितच दिशा व प्रेरणा देणारा ठरेल अशी भावना व्यक्त केली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.पल्लवी पाटील यांनी केले तर आभार अॅड.सुवर्णा राठोड यांनी मानले. या कार्यक्रमास कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र राज्यातून हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.