उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जे सर्वांना दिसते ते वास्तवातील राजकारण नसून पिछाडीवर म्हणजे पडद्यामागे घडणारे राजकारण जनतेसमोर नवसाहित्यिकांनी आणणे आवश्यक आहे. कारण पिछाडीवर जे काही चालू आहे हे समजून घेतल्याशिवाय सर्वसामान्यावरील अन्याय, अत्याचार थांबणार नाहीत, असे प्रतिपादन ८ व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. दत्ता भगत यांनी केले.
पळसप येथील शिक्षणमहर्षी वसंतराव काळे साहित्य नगरीत  आयोजित केलेल्या संमलनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.सतिश् चव्हाण, स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे, प्रा. भास्कर चंदनशिव, अंकुश् नाडे, जिल्हा ग्रंथालयाचे अधिकारी अनिल सुर्यवंशी, शुभांगी काळे, अनुराधा काळे, मधुकर गायकवाड, डॉ. देवानंद शिंदे, उध्दवर  मस्के आदींसह मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा.भगत म्हणाले की, धर्म निरपेक्षता ही संस्कृती व धर्माच्या विरोधात नसून शिक्षकांनी राजकारणातील व्यक्तींना समजून घेतले पाहिजे. तसेच पिछाडीचे राजकारण अत्यंत महत्वाचे असून महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भांडणातील मुद्दे कोणते होते ? हे समोर आलेले नाहीत. तसाच प्रकार महाराष्ट्रातील ताज्या राजकारणाचा दाखला देत ते म्हणाले की, कॉंंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांची सत्ता आहे हे सर्वजण पाहत आहेत. परंतू याच्या पिछाडीचे राजकारण आपल्या समोर आलेले नाही ते येणे फार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ना. धनंजय मुंडे म्हणाले की, येथील साहित्य संमेलनात आध्यात्मीक, कृषी व साहित्य आदी विषय असून अशा प्रकारच्या संमेलनातुन आजच्या व भावी पिढीने आदर्श घेतला पाहिजे, असे आवाहन त्यंानी केले. शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना राजकीय वारसा नसताना आमदार, खासदार व मुख्यमंत्री केले. होत्याचं नव्हत आणि नव्हत्याच होत हे करून दाखविण्याची किमया फक्त शरद पवार यांनीच केल्याचे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. जी मंडली मी पुन्हा येईन असे सांगत होती. त्या ऐवजी न सांगणारी मंडळी सत्तेवर पुन्हा विराजमान झाल्याचा टोला हाणत फडणवीस यांची खिल्ली उडवली. यावेळी बोलताना खा. राजेनिंबाळकर म्हणाले की, राष्ट्रवादी कॉग्रेसला जिल्हयात ख-या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले, असे म्हणत राष्ट्रवादी व शिवसेनेन तेरचा बांध आडवा होता असे सांगून आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी प्रास्ताविकात आ. विक्रम काळे यांनी साहित्य संमेलनामागची भूमिका विषद केली. सूत्रसंचालन डॉ. गणेश बेंळबे यांनी तर आभार प्राचार्य अनिल काळे यांनी मानले. या कार्यक्रमास साहित्यिक, विद्यार्थी  व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top