उस्मानाबाद/प्रतिनिधी-
केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात टेक्निकल टेक्स्टाइल मिशन जाहीर करण्यात आले असून, रोजगार निर्मितीच्या असलेल्या प्रचंड संधी लक्षात घेता कौडगाव (ता.उस्मानाबाद) एमआयडीसीमध्ये टेक्निकल टेक्स्टाइल हब उभारणीची गरज आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून केंद्राकडे प्रस्ताव द्यायला हवा, अशी अपेक्षा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली. या हबसाठी आवश्यक जागा, पाणी,गॅस, वीज आदी मुलभूत सुविधा उपलब्ध असून,यामुळे रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे यासंदर्भात आपण जनजागृतीही करणार आहोत, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
आमदार पाटील यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्पात टेक्निकल टेक्स्टाइल मिशन जाहीर झाल्याने तसेच आपला जिल्हा आकांक्षित असल्याने या मिशनचा आपल्या भागासाठी चांगला फायदा होईल.तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उद्योगाविषयी घोषणा केली होती. त्यावेळी टेक्निकल टेक्स्टाइल प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने एमआयडीसीने प्राथमिक अहवाल तयार केला होता.सध्याच्या मुख्यमंत्री-उद्योगमंत्र्यांना यासंदर्भात बैठक घ्यावी, अशी पत्राद्वारे आपण विनंतीही केली होती. आता केंद्र शासनाने मिशन जाहीर केल्याने उस्मानाबादच्या कौडगाव एमआयडीसीमध्ये हब उभारण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे. केंद्र सरकारने सादर केलेले बजेट समजून घेणे आवश्यक आहे. या मिशनअंतर्गत २०२० पासून २०२३ पर्यंत १ हजार, ४८० कोटी रुपये या उद्योगासाठी प्रोत्साहनपर दिले जाणार आहेत. टेक्स्टाइलमध्ये रोजगार निर्मिती व्हावी, एक्सपोर्ट व्हावे, असा त्याचा उद्देश आहे. या मागणीसाठी जिल्हा परिषदेत ठराव घेणार असून, जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांना ठराव घेण्याची विनंती करणार आहोत, असे आमदार पाटील म्हणाले. कौडगाव एमआयडीसीमध्ये या हबसाठी मूलभूत सुविधा आहेत. २५०० हेक्टर जागा प्रस्तावित असून, त्यापैकी १५०० हेक्टर जागेचे संपादन झाले आहे. उजनी योजनेतून एक एमएलडी पाणी या एमआयडीसाठी राखीव आहे. उपलब्ध सुविधांचा विचार करून शासनाने तातडीने यासाठीचा प्रस्ताव केंद्राला पाठवावा. त्यामुळे कदाचित राज्यातील पहिले हब उस्मानाबादला मिळेल. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, नितीन काळे, सतीश दंडनाईक,उपनगराध्यक्ष अभय इंगळे, संजय लोखंडे आदी उपस्थित होते.
 
Top