उस्मानाबाद/प्रतिनिधी-
फडणवीस सरकार मध्ये जलसंधारणमंत्री राहिलेले शिवसेनेचे भूम-परंडा-वाशीचे आमदार तानाजी सावंत जिल्हयातील राजकारणात पुन्हा सक्रीय झाले आहेत. मंगळवार दि.४ फेबु्रवारी रोजी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मतदार संघातील दौ-यास सुरूवात केली.  पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर नाराज नसून पक्षश्रेष्ठीकडे आपण अन्य आमदार, खासदार ज्या पध्दतीने न्याय मागतात, त्याच पध्दतीने आपणही न्याय मागितल्याचे सांगितले. चार दिवसापुर्वी आ. सावंत यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन कार्यक्रमाचे निमंत्रण ही दिल्याचे सांगितले होते.जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत व अन्य पदाधिका-यांचा ही त्यांनी सत्कार केला.
महाविकास आघाडीच्या स्थापन झालेल्या मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज झाले होते. उध्दव ठाकरे यांच्या शपथविधीला ही उपस्थित राहिले नाहीत. विविध माध्यमामधुन त्यांच्या नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. उस्मानाबाद जिल्हा परिषद मध्ये पदाधिका-यांच्या निवडी दरम्यान सावंत गटाने भाजपासोबत जात धनंजय सावंतना जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष पद घेतले. त्यामुळे शिवसेने -कॉंग्रेस या महाविकास आघाडी ने उभा केलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे उमेदवार पराभूत झाले. जिल्हयातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळण्याचे चिन्ह दिसून येत असतानाच भाजपा आ. सुजितसिंह ठाकूर यांनी विकासाचे राजकारण या शब्दात त्यांनी सावंत गटाचे आभार मानले होते. आ. सावंत त्यांनी मंगळवार दि.४ तारखेपासून मतदार संघात दौरा सुरू केला आहे. वाशी येथील पंचायत समिती व भैरवनाथ शिवशक्ती कारखाना येथे त्यंानी शिवसेना पदाधिका-यांशी गाठीभेटी घेऊन चर्चा केली. तर सायंकाळी सोनारी येथील भैरवनाथ कारखान्यावर शिवसेना पदाधिका-यांशी चर्चा केली. माध्यमासमोर बोलताना आ. तानाजी सावंत यांनी आपण पक्ष श्रेष्ठीवर नाराज नसल्याचे सांगून उस्मानाबाद जिल्हयाला मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे आपण पक्षश्रेष्टीसमोर बोलून दाखविले. यावर पक्षश्रेष्ठीने लवकरच तोडगा निघेल, असे सांगितले. मराठवाडयाच्या हक्काचे २१ टिएमसी पाणी, वॉटर ग्रीड, नदी जोड प्रश्री अन्याय होईल, असा निर्णय सरकारला घेऊ देणार नाही, असेही आ. सावंत यांनी ठणकावून सांगितले.

 
Top