कळंब/प्रतिनिधी-
शिवरायांनी प्रामाणिक प्रयत्न केलेल्या मावळयांना अपयश आले म्हणून कधीही अपमानास्पद वागणूक दिली नाही त्यांना शाबासकी देऊन काम करण्यासाठी प्रोत्साहितच केले,  त्यामुळे त्यांनी माणसे जोडण्याचे काम केले तोडण्याचे नाही, हे छत्रपती  शिवाजी महाराजांकडून शिकले पाहिजे.निष्ठा  काय असते ते मावळ्याकडुन शिका व ते सर्वांनी आचरणात आणा,असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.
कळंब येथे शिवसेवा तालीम संघाच्या वतीने कै. नरसिंग अण्णा जाधव विचार पिठावर शिवजन्मोत्सव समिती च्या वतीने आयोजित व्यख्यानमालेत "छत्रपती शिवरायांपासून काय शिकावे" या विषयावर डॉ. शिवरत्न शेटे व्याख्यान झाले.  विचार पिठावर आ.कैलास पाटील , अनंत   लंगडे , शिवाजी  कापसे, डॉ. वायबसे , नितीन लांडगे, शहाजी चव्हाण, लक्ष्मण हुलजुते,डॉ. रुपेश कवडे, अतुल कवडे, सुरेश कवडे  उपस्थित होते. प्रारंभी शिवप्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली. यावेळी कळंब च्या शिवजयंती चा जागर महाराष्ट्रात घुमतो आहे. ही वैचारिक मेजवानी , शिवसप्ताह तसेच बालव्यख्यातांना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल मुख्यसंयोजक शिवाजी कापसे यांचे कौतुक करून आभार ही मानले.
स्वराज्यासाठी जगू किंवा मरू अशीच प्रतिज्ञा करणारे मावळे होते, पण सद्या माणसं बदलली व मानसिकता ही बदलू लागली आहे. दिलेला शब्द पाळणारा राजा म्हणजे शिवराय , पण सद्या जो शब्द पाळत नाही तो राजकारणी अशीच व्याख्या होवून बसली आहे, खंडूजी खोपडे व्हायचं का कान्होजी जेथे हे ठरवायला हवं. कोणत्या जाती धर्मात जन्म घेतला हे महत्वाचे नाही तर शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्म घेतला याचा अभिमान सर्वांना वाटला पाहिजे छ. शिवरायांनी हिंदू धर्म सोडणाऱ्यांनाही पुन्हा धर्मात घेवुन त्यांना नातेवाईक केले हे शिकण्यासारखे आहे. छ. शिवरायांचे आचरणकर्ते व्हा, वेशभूषा , भगवे वस्त्र , बोटात राजमुद्रा घातल्यानंतर व्यसने करू नका , व्यसन मुक्त व्हा गढ- किल्ल्यांना भेटी देवून अभ्यास करा त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. छ. शिवराय हे पूजनापूरते न ठेवता , प्रत्येकाने काही ना ही घेवून जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करा असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.
व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन प्रा.जगदीश गवळी यांनी केले तर आभार सागर बाराते यांनी मानले.

 
Top