तुळजापूर/ प्रतिनिधी-
तालुक्यातील जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात योगा हॉल उभारणीसाठी जिल्हा परिषदेने वीस लाख रुपये मंजूर केले असून, लवकरच योगा हॉलच्या कामास सुरुवात होईल, अशी माहिती जि. प. सदस्य प्रकाश चव्हाण यांनी जळकोट येथे दिली.
जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विविध प्रश्नांचा आढावा घेतल्यानंतर उपस्थित समितीच्या सदस्यांना माहिती देताना, आरोग्य केंद्राच्या विविध कामासंदर्भात मंजूर निधी संदर्भात प्रकाश चव्हाण यांनी माहिती दिली. चव्हाण यांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य केंद्रासाठी निधी खेचून आणला असल्याचे सांगून पुढे सांगितले की, जळकोट हे गाव मध्यवर्ती ठिकाणी आहे. या आरोग्य केंद्र अंतर्गत अनेक खेड यांचा समावेश आहे. याठिकाणी नागरिकांचे आरोग्य सुदृढ होण्यासाठी या केंद्रात वीस लाख रुपये  खर्चून योगा हॉल  उभारले जाणार आहे. या हॉलचे काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे. हा प्रलंबित प्रश्न आपण मार्गी लावले असल्याचे बैठकीत चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी श्रीमती एस.पी. धरणे यांच्या सेवानिवृत्ती बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या आढावा बैठकीस पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुनीताताई पाटील, पंचायत समिती सदस्य सौ. रेणुका इंगोले, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.एम. पवार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सातपुते, भिवाजी इंगोले, सिद्धार्थ लोखंडे, आरोग्य कर्मचारी व्ही. व्ही. माळी, एम.एस. पठाण,पी.बी.कदम,डी. डी. कुलकर्णी,जी.बी. ढगे,एन.के.कदम,एस.सी. होनाळे,एस.एस. राठोड यांच्यासह रुग्ण कल्याण समितीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top