उस्मानाबाद/प्रतिनिधी-
बळीराजा चेतना अभियानअंतर्गत 6.25 कोटींच्या पुस्तक खरेदीच्या व्यवहाराची विभागीय आयुक्त स्तरावरून चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी करून या प्रकरणाची संचिका कार्यालयातून गायब असल्याचा संशय  व्यक्त केला आहे.
 दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियाना हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला 2017-18 मध्ये 7.50 कोटींचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून 26 जानेवारी 2019 रोजीच्या बळीराजा चेतना अभियान समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या विकासासाठी व शेतक-यांचे मनोबल उंचावून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी शेतक-यांना आधुनिक पध्दतीने कमी खर्चाच्या व कमीत कमी पाणी वापरून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याबाबतचे शेती विषयक प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबविणे व शेतीविषयक पुस्तके खरेदी करणसाठी 196 कृषीविषयक व प्रशिक्षणाच्या 63 पुस्तकांची सूची करण्यात आली. आत्माच्या प्रकल्प संचालकांनी नॅकॉफमार्फत प्रशिक्षण आयोजन व पुस्तके वाटपाचे ठरविले गेले. यासाठी जिल्हाधिका-यांच्या 16 फेबु्रवारी 2019 च्या आदेशानुसार पत्र काढून 7.19 कोटी रुपये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकाकडे वर्ग करण्यात आले. या निधीतून 6.25 कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण विभागाच्या तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आले. सदरील निधी 31 मार्च 2019 अखेर खर्च करणे बंधनकारक होते. त्यासंबंधीची नियमावली पाळण्यात आली नाही व या निधीचा एका कार्यालयाकडून दुस-या कार्यालयाकडे झालेला चेंडू व टोलवाटोलवी सारेच शंकास्पद आहे.जिल्हाभरात 102 वर्गात 7012 शेतक-यांचा सहभाग आहे. या शेतक-यांना 6.25 कोटींची पुस्तके वाटप झाली आहेत का, आजतागायत याचा आढावाही घेतला गेला नाही. त्यामुळे हे सारेच गौडबंगाल असून, याप्रकरणाची विभागीय स्तरावरून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

 
Top