उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्ह्यातील विविध बचत गटांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार उत्पादनांची विक्री अॅमेझॉनसारख्या पोर्टलच्या माध्यमातून देशभरात करण्यात येईल. यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी दिली.
ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता समूहांद्वारा उत्पादित मालाच्या जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन अर्थात आद्या हिरकणी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मुंडे यांच्या हस्ते शनिवारी झाले, यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चना पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नामदेव आघाव, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले आदींची उपस्थिती होती.
मुंडे म्हणाल्या की, बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यवसायाची चळवळ उभी राहिली आहे. अनेक बचत गटांद्वारे दर्जेदार उत्पादने करण्यात येत आहेत. यामध्ये बंजारा पोशाख, शेळीच्या दुधाची विक्री, मातीची भांडी अशा दर्जेदार उत्पादनाची निर्मिती सर्वत्र केली जात आहे. अशा सर्व प्रकारच्या उत्पादनांची विक्री आता ऑनलाईन पद्धतीने अॅमेझॉनसारख्या संकेतस्थळावरून केली जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी बचत गटातील महिलांनी आपल्या उत्पादित मालाचे चांगल्या पद्धतीने ब्रँडिंग व पॅकिंग करणे गरजेचे आहे. शहरातील महिला जुन्या पद्धतीची कामे करण्यास प्राधान्य देत नाहीत. यामुळे महिलांच्या अशा उत्पादनांना शहरात चांगला प्रतिसाद मिळणार आहे. यामुळे याचा चांगला फायदा होणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमास जिल्हाभरातील महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
 
Top