सभापती पदी देवळकर, साळुंके, टेकाळे, शिंदे यांची निवड 
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्हा परिषद उस्मानाबाद विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेच्या एका गुटाने बंडखोरी करत बांधकाम व अर्थ सभापतीपद दत्तात्रय देवळकर तर कृषी पुशसंवर्धन सभापती पद दत्ता साळुंके, महिला व बालकल्याण सभापती पद रत्नमाला टेकाळे, समाजकल्याण सभापतीपद दिग्वीजय शिंदे यांनी पटकावले.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जे राजकारण झाले त्याच पध्दतीचे राजकारण विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत झाले. आ.राणाजगजितसिंह गटाचे राष्ट्रवादी पक्षातील १७ जि.प.सदस्यांनी भाजपासोबत तर शिवसेनेचे आ. प्रा.तानाजी सावंत यांच्या गटाचे ८ जि.प.सदस्यांनी एकत्र येत नवीन आघाडी केली. यामध्ये भाजपाचे ४, राष्ट्रवादीचे १७, सावंत गुट सेनेचे ८ तर कॉंग्रेसमधील दोन महिला सदस्यांनी या नवीन आघाडीला साथ दिली.त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीत ३१ विरूध्द २३ मताने सर्व विषय समितीचे सभापती पदे राणापाटील-सावंत गटाने काबीज केली.
या निवडणुकीमध्ये मात्र शिवसेनेचे निष्ठवंत असलेले व सध्या आ.सावंत गटात गेलेले दत्ता साळुंके यांना सभापती पद दिल्याने त्यांना न्याय मिळाल्याचे मानले जात आहे. तर भाजपा ने जुनिअर असलेल्या दिग्वीजय शिंदेला सभापती पद दिल्यामुळे व्यंकटराव गुंड यांच्या गटाने नाराजगी व्यक्त केली.  गटाच्या वतीने  ज्ञानदेव राजगुरू या ज्येष्ठ सदस्यांची शिफारस केली होती. परंतू ऐन वेळेस आंबेडकर कारखान्याच्या निवडणूकीचे कारण दाखवून राजगुरू यांना बाजूला सारण्यात आले.यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष अस्मिता कांबळे व धनंजय सावंत यांन नव्या सभापतीचा सत्कार केला. चुनाव अधिकारी म्हणुन रामेश्वर रोडगे ने कार्य केले.
आम्ही राष्ट्रवादीचेच पण
राणादादाच्या विचाराचे
या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्षा व भाजपावाशी झालेले आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना पत्रकारांनी आपण सध्या कोणत्या पक्षात आहात, या संदर्भात विचारले असता आम्ही आज ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असून विचाराने मात्र राणादादा सोबत आहोत, आमचे गटनेते देवळकर यांनी व्हिप काढल्याप्रमाणे आम्ही मतदान केले असल्याचे ही त्यांनी सांगितले. त्यामुळे पक्षविरोधी कांही भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हयाच्या विकासासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील, आ.सुजितसिंह ठाकूर, आ.प्रा.तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासाची वाटचाल करू, असे सांगितले.
व्हिप अधिकार जिल्हाध्यक्षांना 
अडीच वर्षापुर्वी जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्यानंतर, त्यावेळेस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील होते. त्यामुळे त्यांना व्हिप काढण्याचा अधिकार होता. त्यांनी त्या वेळेस महेंद्र धुरगुडे व दत्तात्रय देवळकर यांची नावे नेता व उपनेता असे जिल्हाधिका-यांना पत्र दिले होते. सदर पत्र हे पाच वर्षांसाठी ग्राह्य धरले जाते. परंतू मध्यततरी राणापाटील पक्ष सोडून गेल्यानंतर जिल्हाधिका-यांना नव्याने माझ्या नावचे जिल्हाध्यक्ष म्हणून व व्हिप काढण्याचा अधिकार असल्याचे पत्र दिले आहे. त्यानुसार जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष विशेष समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी व्हिप काढाला होता. परंतू तो पाळला गेला नाही, त्यामुळे फुटीर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जि.प.सदस्यांवर अपात्रेची कारवाई लवकरच होईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी सांगितले.
 
Top