शुक्रवारी शोभायात्रेसह ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाचा शुभारंभ
 उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबादेत संत गोरोबाकाका साहित्य नगरीत आयोजित 93 व्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त गुरूवार ९ जानेवारी सायंकाळपर्यंत शहरात दीडशे प्रसिध्द साहित्यीक दाखल होणार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो दाखल झाले आहेत. संमेलनाचे उद्घाटक पद्मश्री ना.धो.महानोर व मावळत्या अध्यक्षा  डॉ.अरूणा ढेरे आज सायंकाळी दाखल होणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतुकराव ठाले-पाटील यांनी दिली.
साहित्य संमेलनानिमित्त शहरात नवा उत्साह, जोश निर्माण झाला आहे. शहरातील मुख्यरस्त्यावरील अनेक कार्यालयाच्या व बंगल्याच्या संरक्षक भिंती विविध चित्रांनी व घोषवाक्यांनी बोलक्या झाल्या आहेत. बाहेरून येणा-या साहित्यीकांचे निवास व्यवस्था विविध हॉटेल व शासकीय विश्रामगृहात करण्यात आली आहे. पुणे-मुंबई-नाशिक येथील वृत्त वाहिण्या व माध्यम प्रतिनिधी शहरात दाखल होत आहेत. देशाच्या विविध राज्यातुन अडीचशे पुस्तकांचे स्टॉल दाखल झाले आहेत. संमेलनस्थळी पुस्तकांचे स्टॉलचे साहित्य घेऊन जाण्याचे काम अंतीम टप्यात आहे.
गोरोबाकाकांच्या निवासस्थानाची प्रतिकृती
अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरातील जि.प.कन्या प्रशालेच्या मैदानावर होत आहे. या ठिकाणाला संत गोरोबा काका साहित्यनगरी असे नामकरण करण्यात आले आहे. १२ व्या शतकात संत साहित्याची निर्मिती करणारे संत गोरोबा काका यांनी संमेलन भरविले होते. त्यामुळे गोरोबा काकांचे नाव या स्थळाला देण्यात आले आहे. या मैदानावर संत गोरोबा काका यांची तत्कालीन निवासाचा देखावा तयार करण्याचे काम शेषनाथ वाघ व त्यांचे सहकारी करीत आहेत.
शोभायात्रा व ग्रंथदिंडी ने होणार शुभारंभ 
उस्मानाबाद शहरात आज शुक्रवारी (दि.10) भव्य शोभायात्रा व  ग्रंथदिंडी निघणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून ही दिंडी संमेलनस्थळी पोहोचणार आहे. यामध्ये विविध 25 ते 30 पथकांचा समावेश असणार आहे. प्रारंभी  प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पालखीमध्ये ग्रंथ ठेवून मान्यवर या पालखीला खांदा ठेवून या दिंडीला प्रारंभ होणार आहे.ग ्रंथदिंडीमध्ये शहर व ग्रामीण भागातील दीड हजारावर विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर 8 विविध लेझीम पथके, 4 झांज पथके, 2 वारकरी मंडळाचे पथके, 9 सजीव देखावे व वेशभुषा पथके, 1 आदिवासी नृत्य पथक, ओडीसी नृत्य पथक आदींचाही यामध्ये सहभाग राहणार आहे. चौकाचौकात या ग्रंथदिंडीचे रांगोळीच्या पायघड्याने व पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात येणार आहे. तसेच जागोजागी विवध सामाजिक संघटनांकडून अल्पोपहाराची तर पालिकेच्यावतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सहभागी विद्याथ्र्यांची संमेलनस्थळी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
ढेरे करणार ग्रंथप्रदर्शनाचा शुभारंभ 
प्रारंभी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शन व विक्रीचा शुभारंभ होणार आहे. यावेळी आयोजित साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, साहित्यिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
 
Top