उस्मानाबाद /प्र्रतिनिधी-
दि. 4 ते ८ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष उस्मानाबाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबाद आणि लेडीज क्लब उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आद्या हिरकणी महोत्सव जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनाचा समारोप लेडीज क्लब येथील मैदानावर करण्यात आला.
या समारोप कार्यक्रमाला जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद डॉ.संजय कोलते, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक निलेश विजयकर, नाबार्ड जिल्हा विकास अधिकारी विनायक कोठारी, जिल्हा अभियान व्यवस्थापक अल्ताफ जिकरे, लेखाधिकारी अप्पासाहेब पवार, जिल्हा व्यवस्थापक समाधान जोगदंड, अमोल सिरसट, गोरक्षनाथ भांगे, सर्व तालुक्यांचे तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, उमरगा तालुक्यातील समुदाय संसाधन व्यक्ती व जिल्हा तसेच तालुकास्तरीय कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हास्तरीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराचे वितरण डॉ.संजय कोलते यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये जिजाऊ महिला स्वयंसहाय्यता समूह दसमेगाव ता.वाशी प्रथम, ख्वाजा गरीब नवाज महिला स्वयंसहाय्यता समुह हातोला ता.वाशी द्वितीय, आधार अपंग महिला स्वयंसहाय्यता समुह सोन्नेवाडी ता.भुम या स्वयंसहाय्यता समूहास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रदर्शनादरम्यान उच्चांकी विक्री करणा-या फातिमा महिला स्वयंसहाय्यता समूह, तेरखेडा ता.वाशी यांना उच्चांकी विक्रीसाठी तर राजमाता महिला स्वयंसहाय्यता समूह, नाईकनगर मुरूम ता.उमरगा या स्वयंसहाय्यता समूहास उत्कृष्ट स्टॉल मांडणीसाठी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उमेद अभियानांतर्गत महिला स्वयंसहाय्यता समुहांना कर्ज वितरण केल्याबद्दल श्री.एम.जे.देशमाने,शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँक तुरोरी ता.उमरगा यांना उत्कृष्ट बँक शाखा व्यवस्थापक तर अभियानाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी श्री.जी.पी.भगत यांचा उत्कृष्ट पत्रकार म्हणुन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्ताफ जिकरे यांनी केले तर निलेश विजयकर, विनायक कोठारी यांनी उपस्थित स्वयंसहाय्यता समुहांना मार्गदर्शन केले. डॉ.संजय कोलते यांनी पुरस्कार प्राप्त स्वयंसहाय्यता समुह, पत्रकार आणि बँक शाखा व्यवस्थापक यांचे अभिनंदन केले आणि महिला स्वयंसहाय्यता समुहांनी पुरस्कार प्राप्त गटांकडून प्रेरणा घेऊन व्यवसाय व व्यवसायाभिमुख उपक्रम वृद्धिंगत करावे तसेच उत्पादनांमध्ये विविधता, सुबकता आणुनऑनलाईन विक्रीसाठी सज्ज राहिले पाहिजे असे सांगितले.महिला स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेली वैशिष्ठयपूर्ण उत्पादने राज्यस्तरीय प्रदर्शने, विविध बाजार आणि नामांकित फ्लीपकार्ट, अॅमॅझॉन यासारख्या संकेतस्थळांवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अंतर्गत जिल्हा तसेच तालुकास्तरीय कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी त्यांनी केले. मागच्या प्रदर्शनांची तुलना करताना या वर्षी घेण्यात आलेल्या प्रदर्शनाच वैशिष्ट्य सांगताना यावेळी उस्मानाबादकरांनी भरभरून प्रतिसाद दिला, 5 दिवसीय प्रदर्शनात जवळपास 14 लाख रुपयांच्या वस्तू व पदार्थांची विक्री झाली.
प्रदर्शनादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना, व्याख्यानांना उस्मानाबादकरांनी दिलेला प्रतिसाद अपूर्व होता असे मत यावेळी डॉ.संजय कोलते यांनी व्यक्त केले. महिला स्वयंसहाय्यता समुहांची चळवळ ही केवळ आर्थिक चळवळ न राहता सामाजिक चळवळ होईल, असे प्रयत्न सर्वांनी एकत्रितपणे करावे आणि सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेला गती द्यावी,असेही आवाहन डॉ.संजय कोलते यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा व्यवस्थापक समाधान जोगदंड यांनी केले तर आभार जिल्हा व्यवस्थापक अमोल सिरसट यांनी केले.
 
Top