उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेचे आ.तानाजी सावंत यांच्या गटाचे ७ तर राष्ट्रवादीचे १७ सदस्य फोडून जिल्हा परिषदेची सत्ता काबिज केली. त्यामुळे बंडखोर सदस्यांच्या अपात्रतेची मागणी जोर धरत आहे. तर शिवसेनेसह राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठीने या बंडखोरीची गंभीर दखल घेतली असून जिल्हा परिषदेतील भाजप-सावंत सेना सत्तेवर संकटाचे सावट पसरले आहे. शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी बंडखोरी सदस्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला समर्थन देणा-या १७ सदस्यांचा पद अपात्रतेचा प्रस्ताव जिलाधिका-यांकडे दाखल केला आहे. त्यामुळे विशेष समितीच्या सभापतीच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सेना-कॉग्रेस -राष्ट्रवादी अशी महाआघाडी झाली होती. यात अध्यक्ष पदासाठी आघाडीच्या वतीने सेनेच्या अंजली शेरखाने तर उपाध्यक्ष पदासांठी कॉंग्रेसचे प्रकाश आष्टे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. भाजपाकडून जि.प.अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीतील भाजपा समर्थक अस्मिता कांबळे तर उपाध्यक्ष पदासाठी सेनेतील बंडखोर तथा आ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपाने सेनेतील आ.तानाजी सावंत यांच्या गटाचे ७ तर राष्ट्रवादीचे १७ सदस्य फोडून जिल्हा परिषदेची सत्ता काबिज केली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या  चिन्हावर निवडून आलेलया १७ सदस्यांनी तर सेनेच्या ७ सदस्यांनी पक्षाचा व्हीप झुगारून आघाडीच्या उमेदवारांना मतदान न करता भाजपा समर्थक कांबले व सेनेतील बंडखोर श्री. सावंत यांना मतदान केले. त्यामुळे महाआघाडीच्या दोन्ही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची राष्ट्रवादीसह शिवसेनेने गंभीर दखल घेतली आहे.

 
Top