उस्मानाबाद /प्रतिनिधी-
महिलांनी नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस उपवास आवर्जून करावा, मात्र मुलींचा घटता जन्मदर ही चिंताजनक बाब असून, मुलींना गर्भातच मारण्याच्या क्रुर  मानसिकतेविरोधात एकजूट दाखवून हा प्रकार थांबण्यासाठीचा निश्चय केला पाहिजे, तरच ख-या अर्थाने व्रत वैकल्याना अर्थ असेल, असे परखड मत सप्तखंजेरीवादक डॉक्टर रामपाल महाराज धारकर यांनी व्यक्त केले.
मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते, शहरातील जिजाऊ चौकात मंगळवारी (दि.14) सायंकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ जन्मोत्सव समितीच्यावतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, पोलीस उपविभागीय अधिकारी मोतीचंद राठोड, शिक्षण तज्ञ एम. डी. देशमुख, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील,माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंख, उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, नगरपालिकेचे सभापती युवराज नळे, नगरसेवक बाळासाहेब काकडे, नगरसेविका चंद्रप्रभा जाधव, जिजाऊ जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष खंडू राऊत, अग्निवेश शिंदे,विवेक कापसे,कार्याध्यक्ष ओम नाईकवाडी, कोषाध्यक्ष मुकुंद घाटगे,सचिव नवनाथ ढगे, राजदीप जालन, संघटक संकेत सूर्यवंशी, डॉक्टर राहुल देशमुख, वर्षाराणी कुदळे,रोहित बागल,सुभाष वाघ,मधुकर अनभुले आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. रामपाल महाराज म्हणाले की, जिजाऊ जयंती साजरी करण्यामागे जिजाऊंचा आदर्श घेणे ही महत्त्वाची संकल्पना आहे, मात्र अलीकडे केवळ औपचारिकता म्हणून जयंती साजरी केली जात आहे.उस्मानाबाद  शहर त्यासाठी अपवाद आहे. उस्मानाबादच्या जिजाऊ जन्मोत्सव समितीने महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन समाजासमोर ठेवत गेल्या बारा वर्षापासून जयंती साजरी करण्यात येत आहे. जिजाऊ जन्मोत्सव समितीच्यावतीने 12 जानेवारी रोजी जन्म देणा-या बाळांच्या मातांचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला,ही कौतुकाची बाब असून रक्तदानसारखा समाजोपयोगी उपक्रमही मोलाचा आहे. महिलांनी आता व्रत वैकल्याच्या पलीकडे जाऊन वैज्ञानिक अंगाने आधुनिकतेची कास धरायला हवी. उस्मानाबाद हा चळवळीचा जिल्हा असून कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेमुळे जिल्ह्याला स्त्री शक्तीचा जिल्हा म्हणून वेगळी ओळख आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या चाळीस वर्षापर्यंत 45 हजार पुस्तकांचे वाचन केले होते. आजकालची मुले वाचन करत नाहीत. पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पालकांनी टीव्हीवरच्या मालिकांपेक्षा विद्याथ्र्यांना वैज्ञानिक शिक्षण देण्याची गरज आहे. डॉक्टर धारकर यांनी समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा यावर परखडपणे भाष्य केले. सप्तखंजिरीच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करत सुमारे तीन तास प्रबोधन आणि मनोरंजन केले.
या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी झाली होती. तत्पूर्वी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी जिजाऊ जन्मोत्सव समितीचे समितीचे कौतुक केले ते म्हणाले की अशा उपक्रमांची शहराला गरज असून असे उपक्रम होत असल्याबद्दल आपल्याला अभिमान आहे उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड यांनीही जन्मोत्सव समितीच्या उपक्रमाबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या. एम डी देशमुख यांनीही महिलांना सशक्त होण्यासाठी आवाहन केले. यावेळी समितीचे अध्यक्ष खंडू राऊत यांनी प्रास्ताविकात येणा-या काळातही जिजाऊ जन्मोत्सव समिती दमदारपणे काम करेल असा विश्वास व्यक्त केला. सूत्रसंचालन दौलत निपाणीकर तर आभार मुकुंद घाटगे यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिजाऊ जन्मोत्सव समितीचे मार्गदर्शक, समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तत्पूर्वी, तालमणी खंडेराव मुळे यांच्या सूरताल संगीत अकॅडमीमधील मुलींनी जिजाऊंची स्फूर्ती गीते सादर केली.यावेळी आनंद वीर यांनी ही गीते लिहिली होती. त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
Top