उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी आलेल्या परिक्षकांनी बालनाट्य कलाकारांना योग्य मार्गदर्शन केल्यास या स्पर्धेतुन जागतिक किर्तीचे कलाकार निर्माण होतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले.
१७ व्यां महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन ३ जानेवारी २०२० रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी नगराध्यक्ष नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, धनंजय शिंगाडे, ज्येष्ठ रंगकर्मी तथा पत्रकार राजाभाऊ वैद्य, मिलींद डावरे, डॉ. आंबेडकर विद्यापीठाचे कला अकादमीचे प्रमुख डॉ.मिलींद माने, नाट्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, समन्वयक तन्मय शेटगार, प्रविण राठोड, सुगत सोनवणे, विजय उंबरे, विश्वनाथ काळे, अजय चिलवंत आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी सांगितले की, बालनाट्य संमेलन, साहित्य संमेलन, एकांकी  स्पर्धा, लोककला महोत्सव आदी सर्व कलागुणांना वाव देण्यासाठी माझे प्रयत्न नेहमीच असतात, असे सांगितले. नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी सुप्तगुणांना वाव देऊन उद्याची पीढी चांगली घडेल, त्यासाठी बालनाट्य स्पर्धा व त्यंाच्या कलागुणांना वाव देणे महत्वाचे आहे, त्यासाठी शहरातील न.प.शाळेतील सर्व विद्यार्थी बालनाट्य संमेलनाचा आनंद घेतील. ज्येष्ठ कलावंती राजाभाऊ वैद्य यांनी पुर्वी नाटक हे करमणुकीचे साधन होते, परंतू सध्या समाज प्रबोधनाचे माध्यम आहे, असे सांगितले. तर धनंजय शिंगाडे यांनी तळागाळातील बालकलाकारांनी आपल्या कलेच्या जोरावर मोठे व्हावे, असे सांगितले. यावेळी मिलींद डावरे यांचेही भाषण झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल शिंगाडे यांनी करताना सर्वांच्या मदतीने नाट्य संमेलन, एकांकी स्पर्धा, लोककला मोहत्सव घेण्यात आले. त्यामुळे उस्मानाबादकरांना सांस्कृतीक मेजवाणी मिळाली. प्रशासन व जनतेच्या सहकार्याबद्दल त्यांनी धन्यवाद मानले. १७ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा ३ ते ९ जानेवारी २०२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संपन्न होत आहे. यामध्ये ४२ नाटकांनी भाग घेतला आहे.

 
Top