उस्मानाबाद /प्रतिनिधी-
गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या उस्मानाबाद नगरपलिकेतील विषय समित्यांच्या सभापतींची शुक्रवारी (दि.3) निवड प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रियेत संख्याबळाच्या जोरावर भाजपमय राष्ट्रवादीने सर्व जागांवर आपले सदस्य बिनविरोध निवडून आणले आहेत.
उस्मानाबाद नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष पदसिद्ध सभापती असलेल्या पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता या विषय समित्या वगळता गेल्या वर्षभरापासून उर्वरित सर्व विषय समित्या सभापतींविनाच केवळ शोभेच्या बनल्या होत्या. परंतु, संख्याबळ व फुटाफुटीच्या राजकारणामुळे याबाबत कोणीच पाऊल उचलले नव्हते. मात्र, दहा दिवसांपूर्वी उस्मानाबाद नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सूरज साळुंके यांच्यावर अविश्वास ठराव आणून दि.31 रोजी भाजपमय राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अभय इंगळे यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली. यातून आत्मविश्वास दुणावलेल्या उस्मानाबाद पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी विषय समित्याही बळकावण्यासाठी नियोजन केले आणि यामध्ये त्यांना यशही आल्याचे शुक्रवारी (दि.3) पार पडलेल्या निवड प्रक्रियेतून दिसत आहे. त्यामुळे पार पडलेल्या विषय समित्यांच्या निवडीमध्ये भाजपमय राष्ट्रवादी काँग्रेसने संख्याबळाच्या जोरावर आपले प्रस्थ वाढविल्याचे दिसून येत आहे. उपविभागीय अधिकारी तथा सभेचे पीठासीन अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रथम सर्वच पक्षांच्या वतीने आपापल्या समित्यांसाठी सदस्यांची नावे लेखी स्वरूपात सुचविण्यात आली. यामध्ये प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज आल्याने सर्व निवडी बिनविरोध पार पडल्याचे पीठासीन अधिकारी रोडगे यांच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात आले. त्यांना मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी निवड प्रकिया पार पाडण्यासाठी सहकार्य केले. याप्रसंगी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष अभय इंगळे यांच्यासह नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी नूतन सभापतींचा पीठासीन अधिकारी रामेश्वर रोडगे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, उप मुख्याधिकारी पृथ्वीराज पवार आदींनी बुके देऊन सत्कार केला.
 
Top