तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजापूर पालिकेच्या शुक्रवारी (दि.17) सर्वसाधारण सभेत गेल्या 4 महिन्यापासून रखडलेल्या 96 विषयांना मंजूर करून घेण्यात नगराध्यक्ष कणे यशस्वी ठरले.
नगराध्यक्ष चंद्रकांत कणे यांच्या दालनात दुपारी 12 वाजता सभेला प्रारंभ झाला. विषय पत्रिकेवरील 103 पैकी 96 विषयांना मंजुरी देण्यात आली तर 7 विषय पुढील बैठकीत ठेवण्याचे निश्चित झाले. बैठकीला मुख्याधिकारी आशिष लोकरे, सभा लिपिक वैभव अंधारे, सहाय्यक महादेव सोनार, लेखापाल कृष्णा काळे, अविनाश काटकर आदी कर्मचारी उपस्थित होते. बैठकीला गटनेत्यासह 10 नगरसेवकांनी दांडी मारली. या बैठकीत पंडित जगदाळे, विजय कंदले, किशोर साठे आदी अनुभवी नगरसेवकांनी अनेक वादग्रस्त विषयांवर तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी 6 विषय पुढील बैठकीत ठेवण्याची नामुष्की ओढवली. चार महिन्यापूर्वी म्हणजेच 19 सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेला मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने केवळ नवरात्र महोत्सव आयोजनाचा विषयाला एकमताने मंजुरी दिली होती. त्यावेळी 80 विषय पुढील बैठकीत ठेवले होते. 16 डिसेंबरच्या सभेलाही केवळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाच्या विषयाला मंजुरी देऊन उर्वरित विषय पुढच्या बैठकीला ठेवले होते. यावेळी पालिकेच्या घाटशीळ रोड येथील वाहन तळाची जागा मंदिर संस्थानला दर्शन मंडपासाठी देण्याचा ऐन वेळच्या विषयासह सन 17-18,चे लेखा परीक्षण अहवाल व सन 17-18 व 18-19 च्या वार्षिक लेख्यांना मंजूरी देणे, वाहनतळ लिलाव, भवानी कुंड लिलाव, दुकान गाळे लिलाव करणे आदी विषय पुढील बैठकीत ठेवण्याचे ठरले.
 
Top