तुळजापूर/प्रतिनिधी-
शाकंभरी नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेसाठी गुरुवारी (दि.26) सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर कुलस्वामिनी तुळजाभवानी माता शेजगृहातील पलंगावर विसावली.तत्पूर्वी सेवेकरी पलंगे कुटुंबीयांनी देवीच्या मंचकी निद्रेसाठी पलंग घासून-पुसून स्वच्छ धुवून घेतला तर आराधी महिलांनी गाद्यांचा कापूस पिंजला. दरम्यान आठ दिवसांची मंचकी निद्रा संपवून 3 जानेवारीला पहाटे तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान होईल तर दुपारी 12 वाजता घटस्थापनेने नवरात्रास प्रारंभ होईल.
गुुरुवारी सकाळी सूुर्य ग्रहण संपल्यानंतर सेवेकरी पलंगे यांनी देवीचा मंंचकी निद्रेची तयारी सुरू केली. प्रारंभी चांदीचा पलंग घासून पुसून स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर पलंगावर नवीन नवार पट्ट्या बांधून घेतल्या. यावेळी विनोद पलंगे,अर्जून पलंगे, प्रथमेश पलंगे, ओंकार पलंगे, प्रशांत पलंगे, अरूण पलंगे, दशरथ पलंगे आदी पलंगे सेेेवेकरी उपस्थित होते. यावेळी पंचक्रोशीतील शेकडो आराधी महिलांनी झांज, हलगीच्या तालावर आराधी गीते गात गाद्यांचा कापूस पिंजला. यावेळी मानकरी जनार्दन निकते यांनी गाद्या शिवल्या तर नागेश कुलकर्णी यांनी मदत केली. त्यानंतर नवीन गाद्या पलंगावर ठेवण्यात येऊन मंचकी निद्रेसाठी पलंग सज्ज ठेवण्यात आला. दरम्यान तुळजाभवानी मातेचा मंचकी निद्रेसाठी कापूस पिंजण्याचा मान पूर्वापार मुस्लिम समाजाला आहे.शम्मू बाशुमीया पिंजारी यांच्याकडे परंपरागतपणे हा मान असून, त्यांना महबुब शम्मु पिंजारी, सलिम शम्मु पिंजारी, अब्बास शम्मु पिंजारी, जावेद शम्मू पिंजारी आदी मुस्लीम बांधवांनी कापूस पिंजण्यास मदत केली.
21 दिवस मंचकी निद्रा
तुळजाभवानी देवी एकमेव चलमूर्ती असून इतर ठिकाणी उत्सव मूर्ती हलविण्यात येते. तुळजाभवानी देवी वर्षभरात तीन वेळा एकूण 21 दिवस मंचकी निद्रा घेते. यामध्ये शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी 8 दिवस, सीमोल्लंघनानंतर 5 दिवस व शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी 8 दिवस देवी पलंगावर मंचकी निद्रा घेत असते.
प्रक्षाळ पूजा 
अभिषेक पूजेनंतर खंडोबाचे पुजारी वाघेंनी आणलेला भंडारा देवीच्या मूर्तीला लावून आई राजा उदो-उदोच्या जयघोषात देवीची मूर्ती सिंहासनावरून हलवून पलंगावर ठेवण्यात आली. तत्पूर्वी गाभाऱ्यात दोन धार्मिक विधी उरकण्यात आले. त्यानंतर पलंगावरच प्रक्षाळ पूजा उरकण्यात आली. यावेळी पुजारी, मंदिर संस्थानचे अधिकारी, सेवेकरी, प्रक्षाळ मंडळाचे सदस्य, भाविक उपस्थित होते.
 
Top