उस्मानाबाद/प्रतिनिधी-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपपरिसर येथील विविध विकास कामांच्या पूर्ततेसाठी आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी अधिसभा सदस्य प्रा.संभाजी भोसले यांनी  कुलगुरु डॉ.प्रमादे येवले यांच्याकडे केली आहे.
अधिसभा सदस्य तथा उस्मानाबाद उपपरिसर मंडळाचे निमंत्रित सदस्य प्रा.संभाजी भोसले यांनी गुरुवारी (दि.26) मा कुलगुरू यांची भेट घेतली. औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाचा व मानाचा समजला जाणारा ‘प्रा.जी.पी.श्रीवास्तव‘ हा राष्ट्रीय पुरस्कार कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांना प्रदान करण्यात आला आहे. याबद्दल प्रा भोसले यांनी मा कुलगुरु यांचा सत्कार केला. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा विवेक गंगणे व प्रा देवेंद्र खुपणे हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मा.कुलगुरु यांच्या समवेत उस्मानाबाद उपपरिसर येथील विविध विषयांवर चर्चा केली. यामध्ये उपपरिसर येथे विद्यार्थी वसतीगृह पूर्णवेळ संचालक आदी प्रश्न प्रा.संभाजी भोसले यांनी मांडले. उपपरिसर स्थापना होऊन 15 वर्षे लोटली आहेत. आगामी काळात शैक्षणिक व प्रशासकीय विकास करण्यात येईल, अशी ग्वाही मा.कुलगुरु यांनी दिली. गेल्या पाच महिन्यात मा कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाची वाटचाल प्रगतीपथावर आहे, असे प्रा भोसले म्हणाले.
 
Top