परंडा/प्रतिनिधी-
परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारात अवैध वाळु उपश्यावर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न शनिवारी (दि.14) पहाटे घडला होता. याप्रकरणी अटक तिघा जणांना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना बुधवारीपर्यंत (दि.18) पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
परंडा तालुका व शहर परिसरात अवैध वाळुचा उपसा करून चोरून वाळुची विक्री करणाऱ्या वाळु माफीयांकडून भोत्रा शिवारात अवैध वाळुउपसा सुरू होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शनिवारी पहाटे तहसीलदारांनी कर्मचाऱ्यांसह सदरील ठिकाणी कारवाई केली. यावेळी एका ट्रॅक्टरचालकाने थेट तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी मयुर वाघमारे, आण्णा खडके, संताजी खडके, संतोष गायकवाड, अरविंद नरुटे, सतिश मेहेर, बाळू गायकवाड, धनाजी गायकवाड, प्रशांत गायकवाड, इंद्रजित महाडीक, बच्चन गायकवाड, धनंजय काळे आदी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आण्णा खडके, मयूर वाघमारे व संताजी खडके या तिघांना पोलिसांनी शनिवारीच अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अटक केलेल्या तिघांना दि.18 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
 
Top