उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौपाटीचा झगमगाट शनिवारी (दि.7) बंद झाला. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असलेली ही चौपाटी साहित्य संमेलनाच्या मंडपाकडे जाण्यासाठी रस्ता हवा म्हणून काढून टाकण्यात आली.मात्र, यामुळे सुमारे 21 दुकानांचे नुकसान झाले तर 50 हून अधिक कामगारांचा रोजगारही बुडाला.
जानेवारी (2020) महिन्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन आकाशवाणी केंद्रानजिक जिल्हा परिषदेची मोकळ्या जागेत हेात आहे. या जागेकडे जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज चौपाटीपासून जाणारा रस्ता रूंद करण्यासाठी नगर पािलकेने अचानकपणे खाद्य पदार्थ विक्रेत्यांना सूचना देऊन दोन तासांत दुकाने हटविण्यास सांगितले. मात्र, विक्रेत्यांनी 50 फुटांचा रस्ता सोडूनही पालिकेने पूर्ण दुकाने हटविण्यास सांगितल्याने दुकानदारांनी शनिवारी परिसर मोकळा केला. यामुळे खाद्यपदार्थाची ही चौपाटी आता बंद झाली आहे.हा परिसर अत्यंत गजबजलेला होता. खाद्य शौकीन सहकुटुंब येऊन खाद्य पदार्थाचा आस्वाद घेत होते. शिवाय यातून 50 हून अधिक जणांना रोजगारही मिळत होता. पालिकेच्या या निर्णयामुळे खाद्य पदार्थ विक्रेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.गरिबांचा रोजगार बुडविणारे संमेलन कुणासाठी घेता,अशा संमेलनाचा आम्ही निषेध करतो, अशी भावना दुकानदार संकेत सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.जागेसाठी मासिक भाडे आकारणी केली जात होती. मात्र, संमेलनाच्या निमित्ताने अचानकपणे दुकाने हटविल्याने रोष निर्माण झाला आहे. 
 
Top