उस्मानाबाद/पतिनिधी- जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज संगणकीय  कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार या विभागाचे कामकाज 1 एप्रिलपासून पेपरलेस होणार आहे. नियोजन विभागाची सर्व कामे आता एका क्लिकवर होणार असल्याने नियोजन विभागाच्या कामकाजात गतिमानता व पारदर्शकता तर येईलच परंतु त्याचबरोबर हे कार्यालय पेपरलेस होण्यासही  मदत होणार  आहे.

          याबाबतची प्रशिक्षण कार्यशाळा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी प्रितम कुंटला, अमोल वडगणे, श्री.एम.पी.ठाकूर, श्री.एम.एल.डोके, श्री.एस.एन बाबशेट्टी, श्री.आर.एन.पडवळ, श्री.विजय पाटील तर ई.एस.डी.एस.सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा.लिमिटेड या कंपनीचे संदेश उगले, तुषार धात्रक, एकनाथ गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नियोजन विभागातील कामकाज पेपरलेस करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी इंटिग्रेटेड प्लानिंग ऑफीस ऑटोमेशन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आय-पास (iPAS) नावाची संगणकीय यंत्रणा राज्यभरात कार्यान्वित केली जाणार आहे. नियोजन विभागातील टपालाचे व्यवस्थापन, कामांचे संनियंत्रण, कामाचे भौगोलिक स्थान,कामांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंतची अद्ययावत स्थिती, निधीचे व्यवस्थापन, विविध स्तरांवरील डॅशबोर्ड यांचा समावेश या प्रणालीत असणार आहे. लोकप्रतिनिधी आणि कार्यान्वयीन यंत्रणा इंटरनेटद्वारे जोडल्या जाणार आहेत. जनतेसाठी प्रत्येक जिल्हयाचे स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात येणार आहे.
या प्रणालीमुळे जिल्हयातील कामकाज संगणकीकृत होऊन सुलभ,लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. जिल्हयात ही प्रक्रिया येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रणालीद्वारे जिल्हा नियोजन समितीचे सर्व कामकाज पार पाडले जाणार असून जानेवारी 2020 अखेर विभाग तसेच राज्य पातळीवरुन या प्रणालीचे संनियंत्रण होणार आहे.
 
Top