उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करणा-या एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये अनेक त्रुटी असल्याने तसेच मालमत्ताधारक व भोगवटधारकांच्या नावामध्ये देखील असंख्य चुका असल्याने सदर एजन्सीचे कामाचे बील न.प. च्या सर्वसाधारण सभेत ठेवण्याचे निर्देश धाराशिव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिले व  त्याची पडताळणी करुन सदर बिलास मंजूरी दिली जाईल असा निर्णय धाराशिव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी घेतला.उस्मानाबाद न.प. ची सर्वसाधारण सभा बुधवारी पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, पालिकेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. या सर्वसाधारण सभेत शहर विकासाच्या अनेक योजना व समस्यांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये शहरातील पालिकेच्या ज्या शाळांच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे त्या शाळेचे बांधकाम व दुरुस्ती नामांकीत खाजगी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ओएनजीसी या कंपनीने काही शाळांच्या बांधकामासाठी मदत करण्याची तयारी दर्शवल्याने नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी दिली. तसेच जिथे या कंपन्यांचा सीएसआर फंड उपलब्ध होणार नाही तेथे पालिका स्व निधीतून शाळांच्या बांधकाम व दुरुस्तीचे कामे करण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच शहर पाणी पुरवठा करणा-या विविध प्रकल्पातील पाण्याचा उपसा करण्यासाठी जनरेटर विकत घेणे व शहरास पाणी पुरवठा करणा-या विविध नळ दुरुस्ती करण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. पालिकेने प्रस्तावीत केलेल्या घरपट्टीबाबत नगररचना विभागाकडून मार्गदर्शन घेऊन पालिकेची घरपट्टी 23 टक्केपयर्र्ंत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरातील साथरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धूर फवारणी, स्वच्छता आदिंची कामे करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचा निर्णय ही या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस शहरातील सर्व नगरसेवक, डॉक्टर, वकील, शिक्षक, पत्रकार आदि एक हजार कुटूंबांना प्रायोगीक तत्वावर डस्टबीन देऊन त्याद्वारे घरातील ओला कचरा संकलीत करुन जैविक खताची निर्मिती करण्याचा निर्णय या बैठकीत मंजूर करण्यात आला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली. या बैठकीस नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, न.प. मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, नगरसेवक सोमनाथ गुरव, उदय निंबाळकर, बालाजी कोरे, सुरेश गवळी पंगुडवाले, सिद्धेश्वर कोळी, अक्षय ढोबळे, युवराज नळे, माणिक बनसोडे, अभय इंगळे, खलिफा कुरेशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते.
रूईभरचे पाणी उचलणार
गटनेते युवराज नळे यांनी रूईभर विजलाईन नव्याने टाकण्याचा प्रस्ताव मांडला होता, त्याचे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला असता. नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी महावितरण कंपनी प्रत्येक वीज कनेक्शनसाठी १० ते १५ लाख भरण्यास सांगत आहे. त्यामुळे एक जनरेटर विकत घेतले तर कामानुसार चार ही ठिकाणी वापरता येईल. सध्या शेकापूर वाडगा, रूईभर, शिंगोली, तेरणा या चारही तलावात शहराला प्रत्येकी एक ते दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे जनरेटर विकत घेतले तर शिंगोली, रूईभर, वाडगा, येथे कामानुसार पाणी उचलण्यासाठी हलवता येईल, असे सांगितले.
 
Top